महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
...खा अंडी, कमवा सदृढ- निरोगी शरिरयष्टी बुधवार, ११ ऑक्टोंबर, २०१७
जागतिक अंडी दिन साजरा करण्‍यामागचा उद्देश लोकांमध्‍ये अंड्यांच्‍या सेवनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि अत्‍यल्‍प दरामध्‍ये उपलब्‍ध होणारी अत्‍युच्‍च दर्जाची (प्रोटीन्‍स) यांचा वापर करुन कुपोषण दूर करणे, हा होय.

कुपोषण नि‍र्मुलन करण्‍यासाठी सर्वसमावेशक प्रथिन स्‍त्रोत अंड्याचा कसा उपयोग करता येईल, याबाबत चर्चा होणे गरजेचे असून अंड्याचे महत्‍व जाणले पाहिजे. जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या मुल्‍यांकनानुसार ज्‍याला 100 गुणांक दिलेले आहे असे आईच्‍या दुधानंतर अंडे हा जगातील कदाचित एकमेव खाद्यपदार्थ आहे. अंडे हा निसर्गाने दिलेला सर्वोत्तम पोषण आहार आहे. अंडे हे नैसर्गिकरित्‍या कवचात बंद असल्‍यामुळे निर्भेळ अन्न घटक असून त्यात को‍णत्‍याही भेसळीला वाव नाही. इतर कोणत्‍याही अन्‍नापेक्षा अंड्याचे जैविक मूल्‍य (बॉयोलॉजीकल व्‍हॅल्‍यू) सर्वाधिक म्हणजे 96 इतके आहे. तर गाईच्‍या दुधाचे जैविक मूल्‍य 87.4 तर मटणाचे 74 इतके आहे.

अंड्यामध्‍ये प्रथिनांचा (प्रोटीन्‍स) मोठा स्‍त्रोत असून 58 ग्रॅमच्‍या एका अंड्यापासून 6 ग्रॅम प्रथिने आढळतात. म्‍हणजेच रुपये 50 ते 60 प्रतिकिलो दराचा विचार करताना अंडे हे जगातील सर्वात स्वस्‍त प्रथिनांचा स्‍त्रोत आहे. अंड्यामध्‍ये क-जीवनसत्‍व वगळता भरपूर प्रमाणात खनिजे व जीवनसत्‍वे जसे की अ, ब, ड, ई, के इत्‍यादी असतात. निरोगी हृदयासाठी आणि पोषणासाठी आवश्‍यक असलेली ओमेगा -3 फॅटी अॅसीड अंड्यात विपूल प्रमाणात आढळून येते. शरीर पोषणास आवश्‍यक समजले जाणारे 9 प्रकारचे अॅमिनो अॅसीड अंड्यामध्‍ये असल्‍यामुळे अंडे हे परिपूर्ण आहार समजले जाते.

अंड्यातील कोलीन हा घटक शरीरामध्‍ये निर्माण होणारा दाह कमी करतो तसेच मानवी रक्‍तातील घातक कॉलेस्‍ट्रॉल (LDL) चे प्रमाण कमी करुन आवश्‍यक कोलेस्‍ट्रॉल (HDL) चे प्रमाण वाढविण्‍यास मदत करीत असल्‍यामुळे हृदय रोगाची जोखीम कमी करते, तसेच कोलीन हे मेंदू आणि चेता संस्‍थेच्‍या आरोग्‍यासाठी पूरक पोषण मूल्‍य असून मेंदू पेशी निरोगी राहण्‍यासाठी आवश्‍यक असणारी फॉस्‍फोलिपीडस हे कोलीनमुळे मिळतात तसेच कोलीनमुळे मुडदूस, अल्‍झायमर, हाडाची ठिसूळता आणि मधूमेहाची जोखीम टाळता येते.

वयोमान परत्‍वे होणारी शरीराची झीज, ताणतणाव, मोतीबिंदू, प्रोस्‍टेट ग्रंथीची वाढ, कर्करोग इत्‍यादी कमी करण्‍यास अंड्यातील सुक्ष्‍म पोषकमूल्‍य सेलिनियम उपयोगी ठरते. निरोगी केसांची वाढ, नखांचे आरोग्‍य, नितळ चमकदार त्‍वचा व शरीर वाढीस अंडे हे आवश्‍यक असल्‍यामुळे सर्वांच्‍या आहारात अंडे असणे गरजेचे आहे. अंगणवाडी, बालवाडी तसेच शाळांमधून शिक्षकांनी अंड्यांचे महत्‍व व मुलांना पटवून दिल्‍यास निरोगी सदृढ भारत निर्माण होण्‍यास मदत होईल, यात शंका नाही.

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे व जीवनसत्वे उदा. ब, क, ड, ई, के इत्यादी अंड्यामध्ये प्रथिनाचा मोठा स्त्रोत असून जवळपास 6 ग्रॅम प्रथिन (प्रोटिन) आढळते. निरोगी हृदयासाठी आणि पोषणासाठी आवश्यक असलेले ओमेगा-3 फॅटीॲसीड अंड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळतात. शरीर पोषणास आवश्यक असलेले 9 प्रकारचे ॲमिनो ॲसिड अंड्यात असल्यामुळे अंडे हे परिपूर्ण आहार समजले जाते. मेंदू आणि चेतासंस्थेच्या आरोग्यासाठी पूरक पोषण घटक अंड्यामध्ये आहे. दैनंदिन आहारात शिफारस केलेल्या एकूण कोलीन पैकी 20 टक्के कोलीन हे अंड्यात असते मेंदू पेशी निरोगी राहण्यासाठी आवश्यक फॉस्फोलिपीडस हे कोलीन मुळे मिळते. अंड्यात असलेल्या विपुल प्रमाणातील जीवनसत्वे आणि पोषणमुलद्रव्ये मुख्यत्वे करुन कोलीन मानवाच्या स्मरणशक्ती वाढीसाठी उपयोगी आहे. ट्रिप्टोफॅन आणि ट्रायरोसीन हे निद्रा हितकारक घटक अंड्यात असतात. (ट्रिप्टोफॅन हे सेरोटोनिन आणि मॅनोटोनिन यामध्ये रुपांतरीत होऊन त्याचा मानवाच्या मनाचा कल आणि झोप यावर चांगला परिणाम घडवून आणते) शरीराची झिज भरुन येण्याकरीता आवश्यक असलेले जीवनसत्व बी- 12 हे अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. शरीराची झिज होताना येणारा ताण- तणाव कमी करण्यासाठी अंड्यातील सेलिनियम हे सुक्ष्मपोषक मुलद्रव्य उपयोगी आहे. एका अंड्यामध्ये 50 मिलिग्रॅम कॅलशिअम असते. त्यामुळे अंड्याच्या सेवनाने काही प्रमाणात कॅलशिअमची कमतरता भरुन निघते. अंड्यातील कोलीन हे घटक शरीरात निर्माण होणारे इन्फ्लेमेशेन (दाह) कमी करीत असल्याने हृदय रोगाची जोखीम कमी करते. दैनिक आहारात जीवनसत्व डी स्त्रोताची 600 आय. यु. आवश्यक असून त्यापैकी 41 आयु. यु. हे एका अंड्यामधून मिळतात. अंड्यातील पेप्टाईडमुळे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते. आहारातील अंड्याच्या समावेशामुळे मानवी रक्तातील घातक कॉलेस्टोरॉल (एलडीएल) चे प्रमाण कमी होऊन आवश्यक कॉलेस्टोरॉल (एचडीएल) प्रमाण वाढते. डोळ्याच्या आरोग्यासाठी कॅरीटोनाईट घटक आहारात समावेश असणे आवश्यक असते. (ल्युटीन आणि झेक्सॅथिंन) ही कॅरेटेनॉईड्स, फ्री रॅडीकलपासून होणारी डोळ्याची हानी थाबवू शकतात.

निरोगी केसांची वाढ व नखांसाठी आवश्यक घटक अंड्यात आहेत. (सल्फर, जीवनसत्वे, मुलद्रव्ये हे केस निरोगी राखतात) अल्ट्राव्हायलेट किरणाने होणारे डोळ्यांचे दुष्परीणाम प्रतिबंध करते. वयोपरत्वे होणारा मोतीबिंदु सारखा दृष्टिदोषाची जोखीम कमी करण्यास मदत होते. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ/ गाठ निर्माण होणे/ कर्करोग यास प्रतिबंध करणारे सेलेनियम हे घटकद्रव्य अंड्यामध्ये आढळते. मुडदुस, अल्झायमर, हाडाची ठिसुळता आणि दोन प्रकारचे मधुमेह याची जोखीम अंड्यातील कोलीन या घटकामुळे कमी होते. रक्तात होणाऱ्या गाठी आणि हृदयविकार याची जोखीम कमी करणारे घटक अंड्यात आहेत.

ताजी अंडी व शिळी अंडी पाण्यात सहज ओळखू शकतात. पातेल्यातील पाण्यात अंडे आडवे झाले तर ताजे आहे, उभे राहीले तर कमी ताजे आहे व तरंगु लागले तर नक्की शिळे आहे असे समजावे व ते खाऊ नये. अंडी फ्रिजमध्ये असल्यास त्यापासुन खाद्य पदार्थ करण्यापूर्वी त्यावर गरम पाणी ओतावे. अंडी मंद अग्नीवर शिजवा, नाहीतर कडक होऊन स्वाद नष्ट होतो. अंडी भांड्यामध्ये पाण्यात ठेवून उकडा नंतर अग्नी कमी करुन 10 मिनीटे ठेवा. अंडी उकडल्यानंतर थंड वाहत्या पाण्यात बुडवा आणि झपाट्याने थंड होऊ द्या असे केल्याने अंड्याचा पिवळा व पांढरा भाग यांच्या दरम्यान काळसर वर्तुळ येत नाही.

वरील विवेचनावरुन अंडी सेवनाचे आहारातील महत्व अधोरेखित होते. म्हणूनच अंडी दिना-‍निमित्त याचे महत्व ओळखून आपण सर्वांनीच आपल्या आहारात अंड्यांचा समावेश करण हितावह यात शंका नाही.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा