महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुरस्कार सर्वांच्या कामाची पावती आहे - सचिंद्र प्रताप सिंह गुरुवार, २० एप्रिल, २०१७
  • सचिंद्र प्रताप सिंह यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर
  • मुख्यमंत्र्यांच्याहस्ते मुंबई येथे पुरस्कार वितरण

यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना राज्य शासनाच्यावतीने उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्या दिनांक 21 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबई येथे जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकत्रित कामाची पावती असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने बचत भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन व भावपूर्ण सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी पुरस्कार एकत्रित कामाची पावती असल्याचे सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, विजय भाकरे, डॉ.नितीन व्यवहारे, संदिप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड आदी उपस्थित होते.

यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन तसेच सत्कार करण्यात आला. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध कर्मचारी संघटनांच्यावतीनेही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हा पुरस्कार आहे. गेल्या काही दिवसात जिल्हा प्रशासनाने खुप काम केले आहे. अनेक चांगले कामे राज्यस्तरावर पोहोचली असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

आपण ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदावर उत्कृष्ट काम करण्याचा संकल्प केल्यास कोणीही तुम्हाला चांगले काम करण्यापासून रोखू शकत नाही. कामामुळेच तुमची चांगली प्रतिमा निर्माण होते. चांगले काम आणि परिश्रमामुळेच आपल्याला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळत असते. स्वत: स्वत:चे अस्तित्व निर्माण करू शकतो. त्यासाठी तन-मन आणि प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे. जे काम हातात घेतले ते पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केल्यास ते शंभर टक्के यशस्वीपणे पूर्ण होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अनेक चांगली कामे करता आली. या कामांचाच पुरस्कार हा परिणाम असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

तत्पुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, तहसिलदार सचिन शेजाळ, बाभुळगावचे तहसिलदार श्री.झाडे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या गेल्या दोन वर्षाच्या उत्कृष्ट कामावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचलन श्री.बिजवे यांनी केले तर आभार श्री.जयसिंगपुरे यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा