महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शासन पाठिशी- पालकमंत्री एकनाथ शिंदे सोमवार, ०४ नोव्हेंबर, २०१९


प्रशासनाच्या संवेदनशिलतेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

औरंगाबाद :
संपूर्ण मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीकांचे संपुर्णत: नुकसान झाले असून खराब झालेले पीक जनावरांना चारा म्हणूनही उपयोगाचे राहीले नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असून शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले. नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावरून परतल्यानंतर ते बोलत होते.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यात खरीप पिकांचे नुकसान झाल्याबाबतची आढावा बैठक सुभेदारी विश्रामगृह येथे आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षिरसागर, खासदार अनिल देसाई व जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपायुक्त पराग सोमण आणि महसुल विभागातील संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

प्रशासनाच्या संवेदनशिलतेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून पंचनामे व इतर मदत करण्याच्या प्रशासनाच्या तत्परतेबाबत उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले. तसेच शेतकऱ्यांच्या भावनांबाबत संवेदनशीलता दाखविल्याबाबत प्रशासनाचे धन्यवाद दिले. तसेच शासन आणि प्रशासन मिळून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, तसेच स्थानिक पातळीवर प्रशासनाशी आमचे कार्यकर्ते आवश्यक तिथे समन्वयाने कार्य करतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. केंद्रेकर यांनी सांगितले की, विभागात अवेळी पावसामुळे एकूण ४२१ महसूल मंडळांपैकी १४१ मंडळात ६५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे व काही मंडळात अतिवृष्टी नसताना काढणीसाठी तयार झालेली पिके यामध्ये मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, ज्वारी अवेळी पावसामुळे खराब झाल्याने जनावरांनाही खाण्यालायक नसल्याने प्रत्यक्ष पाहणीव्दारे स्पष्ट झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत व्हावी यासाठी गावातच अर्ज भरून घ्यावे अशा सूचना केल्या आहेत. २० टक्के बाधीत क्षेत्राचे पंचनामे पुर्ण करण्यात आले आहेत. तसेच सन २०१९ पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानी संबंधित ७१६०४१ इतके अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती दिली. पीकविमा असो किंवा नसो सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचेही श्री. केंद्रेकर यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा