महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आचरा किनाऱ्यावर मतदार जागृतीसाठी सागरी दौड गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

सिंधुदुर्ग : 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने स्वीप अंतर्गत मतदार जागृतीसाठी आचरा किनाऱ्यावर आज सागरी दौडचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप अंतर्गत जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आचरा किनाऱ्यावर सागरी दौड, पथनाट्य व शालेय विद्यार्थ्यांनी वाळू शिल्पांच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन केले.

यावेळी 46- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक मंजूनाथ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या सह अध्यक्षा के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, गट विकास अधिकारी राजेंद्र पराडकर, संतोष जिरगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व आचरा पंचक्रोशीतील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

या सागरी दौडमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लीश मिडीयम स्कूल, आचरा, हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा, आचरा क्रमांक 1 शाळा, आचरे पारवाडी, आचरे डोंगरेवाडी, आचरे उर्दू शाळा, वायंगणी क्रमांक 1 शाळा, कालावल शाळा, वायंगणी ठाणेश्वर शाळा या शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेलता होता. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी वाळू शिल्पांच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन केले. तसेच हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचराच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीवर पथनाट्य सादर केले.

तसेच यावेळी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गच्या कर्मचाऱ्यांनी आचरा तिठा येथे मतदार जागृतीपर दशावतारी नाटीका सादर केली. गट विकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी आनंद कुंभार, राजेंद्र परब, नंदू आचार्य यांच्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या दशावतारी नाटीका व  पथनाट्याला आचरा वासियांनी उत्स्फूर्त दाद दिली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा