महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सन 2018-19 साठी 241 कोटी 46 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी - पालकमंत्री बबनराव लोणीकर गुरुवार, ११ जानेवारी, २०१८
सर्वसाधारण योजनेसाठी 166 कोटी 86 लाख
विशेष घटक योजनेसाठी 71 कोटी 94 लाख
आदिवासी उपयोजनेसाठी 2 कोटी 66 लक्ष रुपये
मार्चअखेरपर्यंत राज्य हागणदारीमुक्त होणार

जालना :
सन 2018-19 या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत 241 कोटी 46 लक्ष 23 हजार रुपयांचा वित्तीय आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेचा 166 कोटी 86 लाख, विशेष घटक योजनेचा 71 कोटी 94 लक्ष तर आदिवासी उपयोजनेसाठी 2 कोटी 66 लक्ष रुपयांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. हा निधी वेळेत दर्जेदार व विकासात्मक कामांवर खर्च न करणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.लोणीकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार नारायण कुचे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी केली असुन आजपर्यंत राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हजार 81 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्राप्त निधीचा विनियोग काटकसरीने व गुणवत्तापूर्ण विकास कामांवर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

संपूर्ण महाराष्ट्र राज्य मार्च, 2018 पर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला शौचालय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आजघडीला राज्यातील 15 जिल्हे, 204 तालुके, 23 हजार ग्रामपंचायती व 32 हजार 800 गावे हागणदारीमुक्त झाले असुन या कामांवर 3 हजार 610 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. उर्वरित शौचालयांच्या उभारणीसाठी 3 हजार 470 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असुन हा निधी केंद्र व राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने शौचालयाचा वापर करुन आपला महाराष्ट्र स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जनमानसामध्ये प्रबोधन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी केले.

जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करणे हेच आपले ध्येय असुन जिल्ह्याचा अधिक गतीने विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीबरोबरच केंद्र शासनाच्या योजनांचा अभ्यास करुन या योजनांच्या माध्यमातून निधी कसा उपलब्ध करुन घेता येईल, यासाठी सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील जनतेला मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अपूर्ण पाणी पुरवठा योजना दुरुस्तीवर भर देण्यात येत असल्याचे सांगत गत तीनवर्षात राज्यातील 5 हजार 648 गावांच्या पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण करण्यात येऊन या कामांवर 2 हजार 850 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच जलस्वराज्य टप्पा-2 साठी 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर असुन यातून अनेकविध योजना पूर्ण करण्यात येणार आहेत. दुषित पाण्याच्या तपासणीसाठी राज्यात 1 हजार 200 पाणी तपासणी प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली असुन या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सहा महिन्यातून 3 वेळेस प्रत्येक गावातील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे यासाठी जलसुरक्षा रक्षकांची नियुक्तीही करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे केली जातील. पदाधिकाऱ्यांनी विकासकामाबद्दल सुचना मांडताना त्या लोकोपयोगी व नागरिकांच्या असलेल्या समस्यांना प्राधान्य देऊन मांडाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री.जोंधळे यांनी सन 2016-17 चा खर्च, 2018-19 चा आराखडा व सन 2017-18 मधील पुनर्विनियोजन आदीबाबत माहिती दिली.

बैठकीचे संचलन व आभार जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सतीष टोपे, सदस्य सर्वश्री राहुल लोणीकर, श्रीमती संगीता गोरंट्याल, सुनिता नवनाथ दौंड, दमयंती रामराव सावंत, उषाबाई भगवानसिंग तोडावत, प्रतिभा सिद्धार्थ बंड, कुशीवर्ता तुकाराम जाधव, सुरेखा संजय लहाने, वैजयंती सुदाम प्रधान, मनिषा गजानन जंजाळ, प्रतिभा इंद्रजित घनवट, अनिता संजय राठोड, लिलाबाई रामराव लोखंडे, अंशीराम कंटुळे, कैलास गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत नाशिकराव साबळे, सोपान त्र्यंबक पाडमुख, यादवराव धोंडीबा राऊत, गणेश सरदारसिंग पवार, गणेशअप्पा फुके, संतोष रघुनाथ अन्नदाते, आमेरखान एकबालखान अहमदखान यांच्यासह पदाधिकारी, अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा