महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट ६० वर्षे करण्याचा निर्णय दोन महिन्यात - दिलीप कांबळे बुधवार, २८ मार्च, २०१८
विधानपरिषद लक्षवेधी :

मुंबई :
ज्येष्ठ नागरिक म्हणून वयाची अट ६५ वरुन ६० वर्षे करण्याबाबतचा निर्णय येत्या दोन महिन्याच्या आत घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा व इतर समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना श्री. कांबळे बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिका क्षेत्रात ज्या जागा ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी आरक्षित ठेवल्या आहेत त्या तशाच ठेवण्याबाबत तसेच या जागा वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. मातोश्री वृद्धाश्रम योजनेअंतर्गत ज्या संस्थांचे अनुदान बंद झाले त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कोल्हापूरच्या धर्तीवर आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतनीस देणाऱ्या संस्थेने अशा मदतनीसांची पूर्ण चौकशी करुनच त्यांना पाठवावे, असे संबंधित संस्थेला निर्देश देण्यात येतील. असे न केल्यास व मदतनीसांकडून काही गुन्हा घडल्यास संबंधित संस्थेला सहआरोपी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधी चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला होता.

मराठी भाषा भवन मुंबईत उभारण्यात येणार - विनोद तावडे
मराठी भाषा भवन मुंबईत उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून यासाठी मुंबईत तीन जागांची निवड करण्यात आली आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य हेमंत टकले यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते. ते म्हणाले, पहिली ते बारावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी या मागणीसंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे योगदान विचारात घेऊन त्यांच्या नावाला साजेसे असे काही करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला होता.

असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणार - विजय देशमुख
राज्यात सुमारे सहा लाख नोंदणी केलेले घरेलू कामगार असून या कामगारांचा समावेश असंघटित कामगारांमध्ये करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी घरेलू कामगारांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

श्री. देशमुख म्हणाले, घरेलू कामगारांना असंघटित कामगारांमध्ये समावेश केल्याने असंघटित कामगारांसाठी असलेले लाभ त्यांना लागू होतील. त्यात कामाचे दर निश्चित करणे, दरवर्षी त्यात वाढ करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे. असंघटित कामगार कल्याणासाठी एकत्रित कल्याण मंडळ काढण्याचा देखील शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा