महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘उज्ज्वला’ने दिली 17 हजार महिलांना धुरापासून मुक्ती ! बुधवार, १९ एप्रिल, २०१७
भंडारा : सामान्य कुटूंबातील स्त्रीला स्वयंपाकाच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजनेचा जिल्ह्यातील 17 हजार कुटूंबांना लाभ मिळाला असून यामुळे महिलांना स्वयंपाकाच्या धुरापासून मुक्ती मिळणार आहे. जिल्ह्यातील 41 हजार 361 कुटूंबांनी यासाठी अर्ज केले होते त्यापैकी 31 हजार 700 कुटूंब पात्र ठरले असून यासर्व कुटूंबांना लवकरच गॅस कनेक्शन वितरित केले जाणार आहे. प्रत्येक पात्र लाभार्थी कुटूंबाला प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ योजनेत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ग्रामीण भागातील झाडांची कत्तल थांबावी, हवेतील प्रदूषण कमी व्हावे व महिलांचे आरोग्य उत्तम रहावे या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्ररेषेखालील यादीत नाव असणे, रेशनकार्ड, आधारकार्ड, गाव नमुना 8-अ व विद्युत बील इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेचे लाभार्थी कुटूंबातील महिला आहेत.

स्वच्छ इंधन बेहतर जीवन या उक्तीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील प्रत्येक गरीब कुटूंबाला नि:शुल्क गॅस कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ योजना सुरू करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या धुराचा महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ योजना देशभर राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात विविध गॅस वितरण कंपन्याच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.

सामाजिक व आर्थिक जनगणना 2011 च्या यादीनुसार भंडारा जिल्ह्यात अंदाजे 52 हजार कुटूंब संख्या असून जिल्ह्यात 1 लाख 88 हजार गॅस कनेक्शन कार्यरत आहेत. तरी सुध्दा गरजु व गरीब कुटूंबाकडे अद्यापही कनेक्शन नसल्याचे गॅस कंपनीकडून सांगितले जात आहे. 2011 च्या यादीमधील 41 हजार कुटूंबांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरले असून त्यापैकी 31 हजार 699 अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया गॅस कंपनीकडून सुरु आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी 16 हजार 861 कुटूंबांना प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचा लाभ देण्यात आला आहे.

सिलेंडरचे सिक्युरिटी डिपॉसिट 1250 रुपये, डिपीआरचे सिक्युरिटी डिपॉसिट 150 रुपये, सुरक्षा गॅस पाईप 100 रुपये, ग्राहक गॅस पुस्तिका 25 रुपये आणि दस्तावेजकरण रुपये 75 असे एकूण 1600 रुपये नि:शुल्क असे या योजनेचे स्वरूप आहे. दोन बर्नरची शेगडीची किंमत अतिरिक्त 900 रुपये साठी लोन सुविधा देण्यात येते. या लोन सुविधेचा लाभ 5 हजार 771 कुटूंबांना देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ योजनेंतर्गत वाटप करण्यास शिल्लक असलेले कनेक्शन गॅस एजंसीमार्फत तात्काळ शंभर टक्के लोन सुविधेसह वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अशा सूचना गॅस एजंसीला देण्यात आल्या आहेत. गरजू कूटुंबांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पात्र सर्व लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच सामाजिक व आर्थिक जनगणना 2011 यादीत समावेश नसलेले परंतु जे गरजु आहेत अशा लाभार्थ्यांकडून गॅस एजंसीधारकांनी अर्ज भरुन घ्यावे व त्याची यादी तयार करावी व जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करावी सूचना देण्यात आल्या आहेत. - जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा