महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्या-राजकुमार बडोले शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
* व्यसनमुक्तीचे आदर्श केंद्रे निर्माण करा
* व्यसन मुक्तीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे
* परमात्मा एक सेवक संस्थेचे कार्य स्तूत्य

नागपूर, दि. 12 : व्यसनेधिनतेपासून तरुण पिढीला मुक्त करण्यात प्रत्येक घरापासून व्यसनमुक्तीची सुरुवात केली तरच व्यसनमुक्त महाराष्ट्राची संकल्पना पूर्ण साकार होईल. असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज व्यक्त केला.

रामटेक येथे परमात्मा एक आनंदधाम या महिला संचालित व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमात राजकुमार बडोले बोलत होते. यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख, उप नगराध्यक्षा श्रीमती कविता मुलमुले, माजी आमदार आशिष जयस्वाल, श्रीमती वर्षाताई पोतदार, व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्राप्त लक्ष्मणराव मेहर, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड उपस्थित होते.

राजकुमार बडोले उपस्थित परमात्मा एक आनंदधाम व्यसनमुक्ती अभियानाच्या सेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी समाजाच्या कल्याणासाठी सुरु केलेले व्यसमुक्तीचे कार्य समाजाच्या सर्वस्तरापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण एकीकडे बलशाली भारताचे स्वप्न पाहतो तर दुसरीकडे आज समाजातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधिन होत असल्याचे भयावह चित्र दिसत आहे. व्यसनमुक्त महाराष्ट्राचा विचार करताना राज्याच्या व्यसनमुक्तीच्या धोरणात मोठ्या प्रमाणात बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

व्यसनमुक्त महाराष्ट्राचे धोरण ठरविताना नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये परमात्मा एक सेवक या संस्थेच्या प्रतिनिधीचा निश्चित विचार करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज समाजात 10 ते 12 वर्षाचा मुलगा व्यसन करताना दिसतो ही व्यसनाधिन परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक पालकाने प्रतिज्ञा घेतली पाहिजे की, माझ्या घरात माझ्यासह कोणीच व्यसनाधिन होणार नाही. तरच आपला संपूर्ण समाज व्यसनमुक्त होवू शकतो.

राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, राज्यात विभाग व जिल्ह्यात सुसज्ज व्यसनमुक्ती केंद्रे निर्माण होणे गरजे असून या केंद्रांच्या माध्यमातून राज्याच्या काना कोपऱ्यात व्यसनमुक्तीबद्दल प्रचार व प्रसार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक संत व महात्म्यांनी व्यसनमुक्ती व स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. समाजातील परमात्मा एक सेवक अशा स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीची चळवळ निर्माण करावी यासाठी शासनस्तरावरुन त्यांना पाठबळ दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी परमात्मा एक आनंदधाम रामटेक महिला आघाडीच्या सेवकांतर्फे रामटेक परिसरातील गावागांवातून व्यसनमुक्ती झाँकी रॅली काढण्यात आली असून या रॅलीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. तसेच समाजातील पाच महिलांनी आपल्या कुटुंबात कुटुंब प्रमुखांना व्यसनमुक्त करण्यास प्रवृत्त केल्यामुळे अशा पाच महिलांचा राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले की, परमात्मा एक सेवक आनंदधाम व्यसनमुक्तीचे लक्ष्मणराव मेहर यांनी व्यसनमुक्तीचे मोठे काम केले असून समाजातील 26 हजार 400 कुटुंबातील व्यक्तींच्या व्यसनमुक्तीचे काम केले आहे. त्यांनी शासनाच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला एका प्रकारे प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार आशिष जयस्वाल यांचेही समयोचित भाषण झाले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा