महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मराठा आरक्षण आंदोलकांच्या भुमिकेचे स्वागत - चंद्रकांत पाटील शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७
  • पालकमंत्र्यांची पत्रपरिषद

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन गंभीर आहे. या संदर्भात आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या विविध संघटनांची नुकतीच कोल्हापूर येथे महागोलमेज परिषद झाली. या बैठकीत या संघटनांनी आरक्षणाच्या मुद्यावर शासनाशी चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. या भुमिकेचे शासनाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे. यामुळे मराठा आरक्षण या मुद्यावर शासनाची न्यायालयीन लढाई सुकर होईल, असा विश्वास त्‍यांनी यावेळी व्यक्त केला.

अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे श्री.पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांचे समवेत विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री.पाटील म्हणाले, मराठा समाज आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यासाठी शासनाला आवश्यक पुरावे या आंदोलकांकडून मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गौण खनिजाच्या अवैध वाहतूक आणि तस्करी बाबत बोलतांना श्री.पाटील यांनी सांगितले की, या संदर्भात मुलभूत धोरणात बदल करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आंध्रप्रदेश, दीव दमण यासारख्या भागातील वाळू उपसा धोरणांचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यासाठी दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतही शासन गंभीर असून शेतकऱ्यांना शेती करणे आर्थिकदृष्ट्या सुकर व्हावे यासाठी उत्पादन खर्च शक्य तितका कमी आणि शक्य झाल्यास मोफत करता येईल का? यादृष्टीने शासन विचार करत आहे. शेतीसाठी पाणी, वीज, खते बि-बियाणे किटकनाशके मोफत देणे, मनरेगातून शेतीसाठी मजूर उपलब्ध करुन देणे, 22 प्रकारच्या पिकांना विशिष्ट भाव निश्चित करणे, अशा पद्धतीची धोरणे ठरविण्याबाबत शासन विचार करीत आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय शेती आधारीत सेवा उद्योगांचा कौशल्य विकास अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या सुचनाही शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार ठिबक जोडणी, सौर उत्पादने दुरुस्ती आदीं बाबींचा त्यात समावेश करण्यात येणार आहे, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

जळगाव येथील महामार्गाच्या डागडुजीचे काम मे अखेर सुरु होईल. त्यामुळे पावसाळ्यात अडचण निर्माण होणार नाही. याच रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सप्टेंबर महिन्यापासून सुरु होईल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा