महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लक्ष्य निर्धारित करून अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचवाव्यात- पालकमंत्री रवींद्र चव्हाण शुक्रवार, १२ जुलै, २०१९


पालघर :
शासन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून विविध योजना राबवित आहे. त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्य निर्धारित करून काम करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोखाडा येथे केले.

मोखाडा तालुक्यातील विकास कामांचा श्री चव्हाण यांनी शुक्रवारी आढावा घेतला. पंचायत समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पास्कल धनारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील यांच्यासह सर्व विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. चव्हाण यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या योजना अपूर्ण आहेत त्या तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी शासनाची महत्वकांक्षी योजना आहे, यामध्ये अद्यापही ज्यांची नावे समाविष्ट झालेली नाहीत त्याची कारणे शोधून तसेच ज्यांच्या सातबारावर खातेफोड झालेली नसेल ती शिबीर आयोजित करून आणि शेतकऱ्यांना या योजनेचे महत्त्व लक्षात आणून देऊन पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले. खोडाळा येथील 5 एमव्हीए वीज उपकेंद्राच्या प्रलंबित असलेल्या कामाविषयी माहिती घेऊन ते तातडीने पूर्ण होण्यासाठी महसूल आणि वन विभागाने मदत करण्याची सूचना त्यांनी केली. पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर असल्याने त्याबाबतही माहिती घेऊन या अंतर्गत प्रलंबित असणारी सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रलंबित सर्व कामांचे कार्यादेश तातडीने देऊन शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या विषयाबाबत आपण स्वतः पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या हस्ते मोखाडा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा