महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
युवकांची व्यसनाधिनता समाजासाठी घातक - डॉ. मुरलीधर चांदेकर सोमवार, २० मार्च, २०१७
युवकांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास धरावा

अमरावती :
स्पर्धेच्या युगामध्ये अपयश आल्यास युवक-युवती निराशेच्या गर्तेत जातात. त्यातूनच चुकीची संगत, सततचा ताण, अपयशाची भीती व तंत्रज्ञानातून मिळविलेले अपुरे ज्ञान यामुळे युवकांची व्यसनाधिन होण्याची प्रवृत्ती वाढत आहे. युवकांमधील व्यसनाधिनता उग्र रूप धारण करत असून ही स्थिती देश व समाजासाठी घातक ठरत आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊन युवकांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास धरावा, असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे कुलगूरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने आयोजित देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. याप्रसंगी अंमली पदार्थ विरोधी केंद्रीय कक्षाचे संचालक संजय झा, गुरुदेव व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आचार्य हरिभाऊ वेरुळकर, बाबा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक पंकज वसाडकर, नशाबंदी मंडळाच्या प्रमुख श्रीमती वर्षा विद्या विलास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर सिनेकलाकार मधुरा वेलणकर (साटम) यांची विशेष उपस्थिती होती.

श्री. चांदेकर म्हणाले, व्यसनाच्या विळख्यात अडकलेले अनेक युवक - युवती यातून बाहेर येऊ इच्छितात पण अपुऱ्या इच्छाशक्तीमुळे ते अशक्य होते. अशावेळी त्यांच्यातील सकारात्मकता वाढवून जीवनात घडणाऱ्या घटनांबद्दलचा दृष्टीकोन बदलविणे आवश्यक आहे. व्यसनाधीन व्यक्तींचे मनोबल उंचावून आपणच समाजाला व्यसनमुक्त करू शकतो. सुदृढ, निरोगी, आशावादी युवक सर्वांगीण विकासातूनच देशाचा विकास घडवू शकतो.

संजय झा यांनी अंमली पदार्थाच्या सेवनाबाबत असलेल्या अधिनियमाची माहिती दिली. अतिशय जागरूकपणे व चौकसपणे सर्व माहिती घेऊन आजच्या युवकांना आम्ही व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांनी सांगितले. युवकांची व्यसनाधिनता ही बिकट समस्या आहे. ड्रग्ज, हेरॉईन, पांढरी शाई अशा अनेक घातक व्यसन करणाऱ्या युवकांचा शोध घेणे कठीण बाब आहे. पण व्यसनाधिनतेची लक्षणे, कृती यावरुन पथकाचे कार्य चालत असल्याची माहिती त्यांनी दिली.

आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी समाजाला व्यसनमुक्त करण्याचे दायित्व सोपविले. युवकांच्या शारीरिक अवस्था, त्यांच्या समस्या, कुटूंबियांनी मित्र म्हणून जाणून घ्याव्यात. शाब्दीक हिंसाचार, सततचा दुखावणारा अहंकार, नाकर्तेपणाची भावना दिल्याने युवकांना असुरक्षीततेची जाणीव होते व भान हरपल्यामुळे त्यांची पावले व्यसनाकडे वळतात. म्हणून युवकांचे मित्र बना असा सल्ला त्यांनी दिला.

श्रीमती वर्षा विद्या विलास यांनी व्यसनाधिन युवकांच्या आकडेवारीचे प्रमाण सांगुन युवकांमध्ये व्यसनांच्या बदलत्या स्वरूपाबद्दल माहिती दिली. आपण कल्पनाही करु शकत नाही अशा व्यसनांची माहिती उपस्थितांना दिली. अशा व्यसनांपासून सतर्क राहून युवापिढीला दूर राहण्याचा सल्ला दिला. विशेषत्वाने उपस्थित असलेल्या सिनेकलाकार मधुरा वेलणकर यांनी युवकांना व्यसनमुक्त राहून जीवनाचा आस्वाद घेत परिपूर्ण जीवन जगण्याचे आवाहन केले.

यावेळी मुलींचा सहभाग असलेल्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाला विद्यार्थी, महिला, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा