महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्‍द - पालकमंत्री प्रा. राम शिंदे सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७
जिल्‍हा शिक्षक पुरस्‍काराचे वितरण - जिल्‍ह्यातील शिक्षक विद्यार्थ्‍यांचा गौरव
अहमदनगर :
अहमदनगर जिल्‍हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असल्‍याचे सांगतानाच शाळेसोबतच शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे केले.

जिल्‍हा शिक्षक पुरस्‍कार वितरण समारंभ व जिल्‍हास्‍तरीय विविध गुणदर्शन व सांस्‍कृतिक कार्यक्रम स्‍पर्धा बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी प्रा. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपाध्‍यक्ष राजश्रीताई घुले, महिला व बालकल्‍याण सभापती श्रीमती अनुराधा नागवडे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, अहमदनगर जिल्‍ह्यात शिक्षण क्षेत्रात पथदर्शी काम झाले आहे. पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्‍या जिल्‍ह्याने शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदर्श नागरिक घडविण्‍याचे काम शिक्षक करतात. जिल्‍ह्याने डिजिटल शाळांचे उद्दिष्‍ट पूर्ण केले असून ही अभिनंदनीय बाब असल्‍याचे सांगून जिल्‍ह्यात 569 शाळा आयएसओ मानांकीत आहेत. या शाळेमध्‍ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. विद्यार्थी सर्वगुण संपन्‍न व्‍हावा, यासाठी शिक्षकांचे प्रयत्‍न कौतुकास्‍पद आहे.

शालेय विद्यार्थ्‍यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्‍यासाठी शासन कटिबध्‍द आहे. स्‍वच्‍छ सुंदर शाळेसोबतच विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्‍याची भुमिका आपण ठेवली पाहिजे. जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत हा वापर वाढतोय ही कौतुकास्‍पद बाब असल्‍याचे सांगून त्‍यांनी पुरस्‍कार प्राप्‍त शिक्षक व बक्षीस पात्र शालेय विद्यार्थ्‍यांचा गौरव केला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले, जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेमधून सनदी अधिकारी घडले आहेत. जिल्‍हा परिषद शाळेत विद्यार्थ्‍यांचा कल वाढत आहे. यासाठी शिक्षकांचे अभिनंदन केले पाहिजे, असे त्‍यांनी सांगितले.

यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपाध्‍यक्षा राजश्रीताई घुले यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी प्रास्‍ताविक केले. सूत्रसंचालन अमोल बागूल तर आभार शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
जिल्‍हा शिक्षक पुरस्‍कार प्राप्‍त शिक्षक - अकोले तालुक्‍यातील पद्मावतीनगरचे गोपाळे दत्‍तू रखमाजी, संगमनेर तालुक्‍यातील गुंजाळवाडी पठारचे भोकनळ गोरक्षनाथ मल्‍हारी, कोपरगाव तालुक्‍यातील कोकमठाणचे खैरे मच्छिंद्र दत्‍तू, राहाता तालुक्‍यातील जाधव जगन्‍नाथ केसू, श्रीरामपूर तालुक्‍यातील गोंडेगावचे शेळके श्रीकृष्‍ण शंकर, राहुरी तालुक्‍यातील गणेशवाडीचे सुंबे धोंडीभाऊ भिवाजी, नेवासा तालुक्‍यातील दत्‍तवाडी चांदाचे जामदार मिलिंद देवीदास, शेवगाव तालुक्‍यातील खामगाव मराठीचे सोनवणे सोमेश्‍वर हरिभाऊ, पाथर्डी तालुक्‍यातील तीनखडीचे बडे धर्मा नवसाजी, जामखेड तालुक्‍यातील पिंपळगाव आळवाचे निंबाळकर हनुमंत रामराव, कर्जत तालुक्‍यातील चांदे खुर्दचे सोमवंशी विलास तुकाराम, श्रीगोंदा तालुक्‍यातील वाळकेमळा हंडोरे अनिल विठ्ठल, पारनेर तालुक्‍यातील राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त नगर तालुक्‍यातील अॅबट मायादेवी विद्यालय भिंगारच्‍या सौ. पाटील शर्मिला महेश व प्रगत माध्‍यमिक विद्यालयाचे पंडीत सुनील यांनाही गौरविण्‍यात आले. स्‍वच्‍छ विद्यालय शाळेचा पुरस्‍कार नगर तालुक्‍यातील नेप्‍ती व श्रीगोंदा तालुक्‍यातील उंडेमळा या शाळांना देण्‍यात आला. या सोबतच जिल्‍हास्‍तरीय विविध गुणदर्शन व सांस्‍कृतिक कार्यक्रम स्‍पर्धेत विशेष प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थ्‍यांचाही गौरव करण्‍यात आला. पोखरकरझाप श्रीमती कुलथे जया जगन्‍नाथ, नगर तालुक्‍यातील हिवरे बाजारचे श्री. ठाणगे भाऊसाहेब धोडींभाऊ यांना शिक्षक पुरस्‍कार देण्‍यात आले. केंद्रप्रमुख पुरस्‍कार श्रीगोदा तालुक्‍यातील श्री. कुलगुंडे चंद्रकांत धोंडीबा यांना तर विशेष पुरस्‍कार नगर तालुक्‍यातील निंबोडीच्‍या श्रीमती पाटील लीना सुभाषचंद्र यांना देण्‍यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा