महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘सीड्स बाँबींग’मुळे वृक्ष लागवड मोहिमेला बळ मिळणार - विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर गुरुवार, ०५ जुलै, २०१८
औरंगाबाद : शासनाने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. आपल्या जिल्ह्याला 2 कोटी 91 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिलेले असताना आपण ते 4 कोटी एवढे वाढवून घेतले आहे. हे उद्दिष्ट आपणास साध्य करायचे आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी ‘सीड्स बाँबींग’ या उपक्रमामुळे वृक्ष लागवड मोहिमेला बळ मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले.

वन विभाग आणि एअर एलोरा एव्हिएशन या संस्थेमार्फत दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात हेलिकॉप्टरद्वारे सीड्स बंबींगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ.भापकर म्हणाले की, ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी सीड्स बंबींग म्हणजेच हवेतून बिया फेकण्याचा हा उपक्रम देशात पहिलाच असून तो खरंच खूप कौतुकास पात्र आहे. विशेष म्हणजे या सीड्स बॉलमध्ये समाविष्ट असणाऱ्या बिया ह्या सिताफळ, चिंच, करंजा, साग यांच्या असल्याने त्या कमी पावसातही तग धरुन राहतात. मराठवाड्यात अशा प्रयोगाची गरज असल्याचे सांगून डॉ.भापकर म्हणाले की, मराठवाडा हरित करण्यासाठी उद्योजक आणि प्रशासन यांच्यामध्ये सामंजस्य करार होणे गरजेचे आहे. या माध्यमातून सीएसआर निधीचाही उपयोग वृक्षलागवड मोहिमेसाठी करता येऊ शकेल. मराठवाड्यातील 433 टेकड्या हिरव्या करण्यासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वृक्ष संवर्धनासाठी ‘माझी शाळा-माझी टेकडी’ हा उपक्रम देखील यशस्वीरित्या राबविण्यात येत असल्योचही डॉ.भापकर यांनी सांगितले.

इको बटालियनचे कमांडिंग ऑफिसर श्री.व्यंकटेश यावेळी म्हणाले की, या प्रयोगामध्ये इको बटालियनचा देखील महत्वाचा सहभाग आहे. जवळपास 3 लाख सीड्स बॉल या बटालियनने बनविले असून ते आज हवेतून टाकण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा