महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बेरोजगार युवकांनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा - केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर बुधवार, ०८ ऑगस्ट, २०१८
यवतमाळ : केंद्र शासनाने घरगुती व्यवसाय, कुटीर उद्योग, शेतीवर आधारीत व्यवसाय व इतर लघु उद्योगासाठी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेत विना तारण सवलतीने कर्ज सुविधा उपलब्ध असल्यामुळे बेरोजगार युवक व नागरिकांनी मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले.

आर्णि येथील माहेर मंगल कार्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री निलय नाईक, राजू तोडसाम, माजी मंत्री संजय देशमुख, राजाभाऊ ठाकरे, राजू डांगे आदी उपस्थित होते.

सदर योजना ही शिशू, किशोर आणि तरुण गटात आहे, असे सांगून केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर म्हणाले, या योजनेत 10 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा आहे. सिंचनाच्या बाबतीत ते म्हणाले, राज्याला सिंचनासाठी केंद्रातून भरघोस निधी उपलब्ध होत आहे. सिंचनात असलेले मागासलेपण कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व नद्यांवर बॅरेजेस बांधण्याचे नियोजन असून सिंचन, रस्ते, वीज, रेल्वे आदी सुविधा नागरिकांना मिळत आहे. शासनाच्या विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. पीक विम्याचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून त्याचे वाटप करण्यात आले आहे. या सरकारच्या काळात युरियाचे भाव वाढले नाही तसेच टंचाईसुद्धा निर्माण झाली नाही.

शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव जाहीर करून ठोस निर्णय घेतला आहे. किटकनाशक फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना शासनाने चार लाखांची मदत दिली आहे. प्रत्येक बेघरांना शासन घर देणार असून प्रत्येक कुटुंबाला गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य नीलय नाईक यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा