महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
13 कोटी वृक्षारोपण महामोहिम : राज्यस्तरीय शुभारंभ वरप येथे शनिवार, ३० जून, २०१८
आचार्य बाळकृष्ण, सुभाष घई, जग्गी वासुदेवही येणार

ठाणे, दि. ३० :
१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ कल्याण जवळील वरप गाव येथून होत असून यासाठी रविवार जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सदगुरू जग्गी वासुदेव, सिने निर्माता सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था व कल्याण परिसरातील गावकरी देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. शहाड रेल्वेस्थानकाजवळून मुरबाडकडे जाणाऱ्या रत्यावर वरप गाव असून येथील राधा स्वामी सत्संग आश्रमामागील वन विभागाच्या संरक्षितवन सर्व्हे क्र. २५ येथील जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येऊन हा शुभारंभ होईल. सुमारे 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वरप येथील वन विभागाची ही जवळपास ३१ हेक्टर जागा असून याठिकाणी २२ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहितीही उप वन संरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली. यावेळी कन्या वन समृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

कोकणासाठी १ कोटी ४१ लाख १३ हजार उद्दिष्ट

कोकण महसूल विभागातील सातही जिल्ह्यांसाठी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १ कोटी ४१ लाख १३ हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात ठाणे जिल्ह्यासाठी ३४ लाख ५४ हजार रोपांचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी १० लाख १ हजार वृक्षारोपणाचे लक्ष्य गाठून अतिरिक्त तीन लाख झाडे लावण्यात आली होती एकूण १३ लाख ९७ हजार ४८० वृक्ष लागवड झाली होती.

यंदा सुमारे २३ लाख ५० हजार झाडे वनविभागाकडून लावली जाणार आहे. तर ४ लाख ६९ हजार वृक्षांचे रोपण ग्रामपंचायतींकडून केले जाणार आहे. तर उर्वरीत वृक्षांचे रोपण जिल्ह्यातील महापालिकांच्या वतीने होणार आहे. वनविभागाच्या ३४९ ठिकाणी हे वृक्षारोपण होणार असून अन्य खासगी ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा