महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
टॅंकर भरण्यासाठी एमआयडीसीतील पॉईंट चोवीस तास खुले ठेवण्याचे आदेश रविवार, १३ मे, २०१८
पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली टंचाई निवारणाची महत्वपूर्ण बैठक

यवतमाळ
: शहरात निर्माण झालेली पाण्याची अभुतपूर्व टंचाई निवारण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असून रविवार दि. 13 मे रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत टॅंकरला पाणी भरण्यासाठी एमआयडीसीतील पॉईंट चोवीस तास सुरू ठेवण्याबरोबरच अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आदेश देण्यात आले.

अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे शहरातील जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे टंचाईच्या इतर अनेक उपाययोजनासोबतच टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर देण्यात येत आहे. सध्या नगरपरिषदेच्या टॅंकरला एम.आय.डी.सी.तून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, याठिकाणी एकाच वेळी पाणी भरण्यासाठी टॅंकरची गर्दी होत असल्यामुळे नंबर लागत नाही. पर्यायाने व्यवस्था असून देखील जनतेला वेळेत पाणी मिळत नाही. त्यामुळे आता एमआयडीसीतील पॉईंट टॅंकरसाठी 24 तास खुले राहणार असून टॅंकरसाठीही वेळापत्रक आखून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणी प्लंबर तसेच प्रसंगी पोलीस संरक्षणही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याची मुख्य भिस्त टॅंकरवर असल्यामुळे अतिरिक्त टॅंकरची डिमांड मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. पावसानंतरही निळोणा व चापडोह धरण पूर्ण भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, त्यामुळे जुलैअखेरपर्यंत टंचाईचे नियोजन करून शहरानजीकच्या ग्रामीण भागात पाण्याचे स्त्रोत शोधण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावरून किन्ही, भोसा, डोळंबा येथे पाण्याचे स्त्रोत असून याबाबत सर्व संबंधितांची बैठक उद्या घेणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपत्तीच्या काळात हेल्पलाईनची भूमिका महत्वाची असल्यामुळे नगरपरिषदेने तत्काळ हेल्पलाईन सुरू करून हेल्पलाईन क्रमांकाची प्रसिद्धी करावी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक तातडीने सुरू करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. तसेच टॅंकरचे नंबर, ड्रायव्हरचा मोबाईल नंबर व अलॉट झालेला वार्ड प्रसिद्धीस देण्यात यावा. निर्धारित केलेल्या प्रभागा व्यतिरिक्त इतर ठिकाणी टॅंकर आढळल्यास चालकावर कारवाई करण्यात यावी. टॅंकरव्दारे पाणीपुरवठा नियमित होतो किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी स्कॉड तयार करण्यात यावे. टॅंकरचे रोस्टर तयार करून रिकामा झालेल्या टॅंकर दोन तासानंतरच भरायला जाण्यासाठी जीपीएसवर ट्रॅक झाला पाहिजे, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. शहरातील स्लम एरियात पाणीपुरवठा नियमित करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. टंचाई निवारण्यासाठी नगरपरिषदेला कोणत्याही स्वरूपाचे सहाय्य लागल्यास तातडीने सुचना देण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

बैठकीला विभागीय आयुक्त पियुष सिंह, प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, मजीप्राचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले, उपविभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे, मुख्याधिकारी श्री. अढागळे, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता श्री. चितळे, एमआयडीसी व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा