महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील ग्रामीण महिला स्वयंसहायता प्रकल्पाला 25 लाखांचे अनुदान रविवार, १६ जुलै, २०१७
बळीराजा चेतना अभियानांतर्गत मुंबईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशनचा उपक्रम

यवतमाळ :
जिल्ह्यात सुरु असलेल्या बळीराजा चेतना अभियानांतर्गत मुंबईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता प्रकल्पाला 25 लक्ष रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पांढरकवडा येथील कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन प्रकल्पाच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

यावेळी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, उद्योग समुहाचे उपाध्यक्ष रोहीत शेलाटकर, ग्रँड मराठा फाऊंडेशनचे राजेश तावडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जैस्वाल, अनुसूचित क्षेत्र स्थानिक विकास स्वराज्य मंडळचे अध्यक्ष तुळशीराम कुमरे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, सचिव प्रवीण कुळकर्णी, माजी जि. प. सदस्य धर्माजी आत्राम, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक सी. यू. पाटील, अकोला येथील पं.कृ.वि. कापूस बियाणे संशोधन केंद्राचे डॉ. टी. एच. राठोड ,केव्हीसीचे संचालक डॉ.एस.यू. नेमाडे, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या व ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता प्रकल्पाच्या पहिल्या केंद्रासाठी अनिवासी भारतीय व इंग्लंड येथील एका मोठ्या उद्योग समुहाने हा पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करण्याच्या दृष्टीने व कृषीमालाला गावस्तरावर प्रक्रिया करून सरळ ग्राहकांना विकण्याच्या पेसा मधील 200 ग्रामपंचायतींना याचा लाभ होणार आहे. यावेळी ५० शेतकरी विधवांना अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडून सरळ वाणाच्या कापसाच्या बियाणांचे तर कृषीखात्यामार्फत युरियाचे दिलासा संस्थेकडून वाटप करण्यात आले. यावेळी ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता प्रकल्पाला आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी बोलताना शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, हा पहिला पायलट प्रकल्प पांढरकवडा येथे अनुसूचित क्षेत्र स्थानिक विकास स्वराज्य मंडळ व मुंबईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या मदतीने सुरु करण्यात येत आहे. यामध्ये दालमीलसारखे प्रक्रिया उद्योग, कृषीमाल तारण, ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, पत पुरवठा करण्यासाठी पतपेढी यासारखे जीवनमान उंचाविणारे कार्यक्रम सुरु करण्यात येतील. तसेच पुढील टप्प्यात पेसा अंतर्गत दहा गावासाठी एक अशारीतीने 200 गावात एक केंद्र लोकसहभागातून सुरु करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशनचे राजेश तावडे म्हणाले, सर्व शेतकरी विधवांच्या पाल्यांना मागील पाच वर्षांपासून विदर्भ जनआंदोलन समितीच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी मदत देण्यात येत आहे. यापुढेही ही मदत गरजू पाल्यांना देण्याची येईल. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी शेतकरी हितांच्या महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. राज्य सरकार ऐतिहासिक कर्जमाफी करून थांबणार नसून आता शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे खरी वाटचाल सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. पांढरकवडा वनविभागाचे उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांनी या माध्यमातून एक हजार ग्रामीण जनतेला रोजगार मिळत असल्याची माहिती दिली. तसेच वन विभाग व पेसा गावातील महासंघाच्या मार्फत रोजगार निर्मितीसाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. बळीराजा चेतना अभियान व अनुसूचित क्षेत्र स्थानिक विकास स्वराज्य मंडळ (महासंघ) च्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता प्रकल्पाला योजनांची जोड घालून मदत करण्याचे आश्वासन दिले. विभागीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक सी. यू. पाटील, डॉ.टी. एच. राठोड आणि डॉ. एस. यू.नेमाडे यांनी महिला शेतकऱ्यांना व आदिवासी नागरिकांना कृषी केंद्राची पायरी चढण्यापूर्वी एकदा आमचा सल्ला घ्या व लागवडीचा खर्च 50 टक्याने कमी करा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन अर्पणा मालिकर यांनी तर आभार पंचायत राज अधिकारी विनकरे यांनी मानले. यावेळी पांढरकवडा वनविभागाचे उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, मानद वन व वन्यजीव संरक्षक प्रा. डॉ. विराणी, आदिवासी प्रकल्प अधिकारी डाखोरे, मंडळ विकास अधिकारी घसाळकर, सुरेश बोलेनवर ,मोहन जाधव, अंकित नैताम, अब्दुला गिलानी, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, भीमराव नैताम, शेखर जोशी, हिवरा सरपंच विलास आत्राम, माजी जि.प. सदस्य लेतुजी जुनघरे उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा