महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
युपीएससी परीक्षेमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करणार - विनोद तावडे मंगळवार, २७ मार्च, २०१८
विधानपरिषद इतर कामकाज :

मुंबई :
युपीएससी परीक्षेमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

युपीएससी/एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी क्लासेसमार्फत जास्त फी घेतली जाते व या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत सदस्य हेमंत टकले, जयदेव गायकवाड यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना श्री. तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्रंथालय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षांचा सराव होण्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना १० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांची माहिती होण्यासाठी संकेतस्थळाबरोबरच वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात येईल. सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग यांची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

निकषाबाहेर परीक्षा केंद्राची निवड होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई - विनोद तावडे
योग्य सोयी-सुविधा नसलेल्या ठिकाणी १० वीच्या परीक्षेसाठी हेतूपुरस्सर केंद्राची निवड होत आहे, निकषाबाहेर परीक्षा केंद्राची निवड होत असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

दहावी/बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना श्री. तावडे म्हणाले, या परीक्षांमध्ये कॉपी होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येते. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षक आमदारांनी याबाबत हिंमत दाखविल्यास कॉपीचा प्रश्न राहणार नाही. परीक्षेला एका बाकावर दोन विद्यार्थी बसविणे चुकीचे आहे. असे झाले असल्यास याबाबत चौकशी करण्यात येईल.

या चर्चेत सदस्य तानाजी सावंत यांनी सहभाग घेतला होता.

कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील - डॉ.रणजित पाटील
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडला लागलेली आग व कचऱ्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत नियम ९७ अन्वये सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन ठिकाणी जागा निश्चित केली आहे. यासाठी एकूण २९ कोटी प्राप्त झाले आहेत. या पद्धतींमध्ये ७०० मे.टन. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडणार नाही. कचरा टाकण्याच्या जागेवर अतिक्रमण झाले असल्यास ते काढण्याबाबत महापालिकेला निर्देश देण्यात येतील. कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये, यासाठी संबंधित महापालिकेकडून रासायनिक फवारणी नियमितपणे करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय उपचारात सामग्रीचा पुन्हा वापर होत असल्यास संबंधितांवर कारवाई - मदन येरावार
वैद्यकीय उपचार करताना महत्वाच्या प्रक्रियेमध्ये वापरलेल्या सामग्रीचा पुन्हा वापर करुन गरीब माणसाच्या जीवाशी कोणी खेळत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणालाही क्षमा केली जाणार नाही, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

खासगी रुग्णालयात ॲन्जीओप्लास्टीसारख्या हृदयरोगातील महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये एकदा वापरलेल्या सामग्रीचा पुन्हा वापर होत असल्याबाबत सदस्य जयवंतराव जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री. येरावार म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागाने रुग्णालयाची तपासणी करण्याची स्वतंत्र मोहीम हाती घेतली होती. यामध्ये दोषी आढळलेल्या रुग्णालयांवर १८ (सी) अंतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयातील खटल्यांचा पाठपुरावा सुरु आहे. कुठल्या रुग्णालयात १० टक्के कोट्याअंतर्गत किती खाटा उपलब्ध आहेत याबाबत ऑनलाईन माहिती मिळते. रुग्णालयाच्या आवारात आरोग्यसेवक नेमले आहेत. जी रुग्णालये नियमानुसार गरीब रुग्णांना सेवा देत नसतील तर अशा रुग्णालयांच्या सवलती काढून घेऊ, असेही श्री. येरावार यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री जगन्नाथ शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला होता.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा