महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे यंत्रणांनी ताळमेळ ठेवून मुदतीत पूर्ण करावीत- डॉ.दीपक म्हैसेकर बुधवार, १५ मे, २०१९


पुणे : विभागातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध मंजूर कामांचा सर्व यंत्रणांनी आढावा घेऊन आपापसात ताळमेळ ठेवून मंजूर विकास कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखी तळ/मार्ग, श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी विधान भवन सभागृहात डॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, भूसंपादन उपायुक्त जयंत पिंपळगावकर, विशेष कार्य अधिकारी उत्तम चव्हाण बैठकीला उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र परिसराचा विकास करुन त्याठिकाणी भाविकांना आवश्यक सोई सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामांना यापूर्वी मंजूरी देण्यात आली आहे. मंजूरी देण्यात आलेल्या कामांच्या प्रगतीचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सादर केला. उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कालबद्ध नियोजन करुन, आवश्यक असल्यास अनुदानाची मागणी वेळेवर करुन, सुरु असलेली कामे मागे पडणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेण्याची सूचनाही डॉ.म्हैसेकर यांनी यावेळी केली.

संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा नियोजन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची माहिती बैठकीत सादर केली. श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर येथील माणकेश्वर वाडा व मुख्य मंदिराभोवतीचा परिसर विकसीत करणे, श्री क्षेत्र भीमाशंकर येथील सामुहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक शैाचालय, महादेव वन, दगडी मंडप बांधकाम, मिडी बसेस तसेच श्री क्षेत्र देहू व आळंदी पालखी मार्गावरील व पंढरपूर येथील चालू असलेल्या विकास कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा