महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सतारे पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे : जयकुमार रावल मंगळवार, १३ मार्च, २०१८
धुळे : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून सतारे येथे कार्यान्वित करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

सतारे, ता. शिंदखेडा येथे आज दुपारी मंत्री श्री.रावल यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच दाजभाऊ ठाकरे, नरेंद्र गिरासे, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, ग्रामसेवक संदीप देवरे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता ए व्ही. बिरारी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.रावल म्हणाले, शिंदखेडा तालुका विकासासाठी सिंचन, शिक्षण, उद्योग आवश्यक आहेत. या त्रिसूत्रीतून तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यात येईल. सतारे येथील पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 54 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे. या योजनेमुळे सतारे गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी मदत होईल. ही योजना पूर्णत्वास आल्यावर ग्रामस्थांना शुद्ध आणि पुरेसे पाणी उपलब्ध होईल. आगामी काळात तालुका तापी- बुराई, सुलवाडे- जामफळ योजनेच्या माध्यमातून बागायत होईल.

या योजनेचे काम गुणवत्तापूर्ण होईल याची दक्षता पाणी पुरवठा विभागाने घ्यावी. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे म्हणून राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यातील 90 गावांत कामे करण्यात येत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील, असेही श्री.रावल यांनी सांगितले.

यावेळी श्री.बिरारी यांनी योजनेची माहिती दिली. या योजनेत उद्भव विहीर, पंपगृह, पंपिंगसाठी यंत्रसामग्री, उर्ध्वरण नलिका, उंच पाण्याची टाकी, गावातील वितरण व्यवस्था, किरकोळ कामांसह जलकुंभास तारेचे कंपाऊंड, प्रवेशद्वार आदींचा समावेश असेल. नरेंद्र गिरासे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री.वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ, शेतकरी, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा