महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून सातपुड्यातील चारमाळी, रुईखेडा, अंबापाणी सौरऊर्जेने उजळले गुरुवार, ०७ डिसेंबर, २०१७
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल हा आदिवासी बहुल तालुका. सातपुड्याच्या पर्वत रांगेतील चारमाळी, रुईखेळा, अंबापाणी ही पाड्यापर्यंत अद्याप वीज पोहोचलेली नाही. जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील हे जरी जळगाव जिल्ह्यातील राहणारे नसले तरी यापूर्वी त्यांनी जिल्ह्यात काम केलेले असल्यामुळे त्यांना जिल्ह्याची भौगोलिक माहिती ज्ञात होतीच. या माहितीच्या आधारावरच त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचेकडून जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील गावांच्या विकासाबाबत चर्चा केली. आदिवासी पाड्यातील समस्या आणि गरजांची माहिती घेतली. आणि पहिल्या चर्चेतच निर्णय घेण्यात आला की, विद्युतीकरणाला प्राधान्य देत ज्या गावांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही. त्या गावांमध्ये सौर उर्जेवर वीजेचे दिवे उपलब्ध करुन द्यायचे. यासाठी यावल तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चारमाळी, रुईखेळा, अंबापाणी या तीन पाड्यांची निवड केली गेली.

सातपुड्यातील आदिवासी पाड्यांचे महसुलीकरण झाले पण अनेक गावांमध्ये रस्ते, वीज पोहचू शकलेली नाही. अनेक वर्षाच्या लढ्यानंतर या पाड्यांना महसुली दर्जा मिळाला आहे. पालकमंत्री श्री.पाटील यांनी अशा दुर्लक्षित गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेचा निधी वापरण्यात येत आहे. या निधीमधून त्यांनी मौजे अंबापाणी 128, चारमाळी 123, रुईक्षेळा 108 असे 355 सोलर लाईट लावून गावे प्रकाशमान केली आहेत. या गावात सोलर लाईट लागल्यामुळे पालकमंत्री श्री.पाटील यांच्या प्रयत्नाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे.

येत्या काही दिवसात आणखी दहा गावे विकासाच्या अजेंड्यांवर असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 55 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून नवीन्यपूर्ण योजनेतून हे काम पूर्णत्वास नेण्यात आले आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्‍या या सोलर लाईटमुळे गावात आठ ते दहा तास वीज उपलब्ध होत आहे. या वीजेमुळे आदिवासी बांधवाच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न पालकमंत्री श्री.पाटील यांनी केला आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावात वीज आल्याने आदिवासी बांधवांनी जणू दिवाळीच साजरी केली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा