महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणुकीशी संबंधित मुद्रण साहित्यावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव व पत्ता आवश्यक- राहुल रेखावार गुरुवार, १४ मार्च, २०१९


धुळे :
धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करावे. निवडणुकीशी संबंधित कुठल्याही मुद्रण साहित्यावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व संपूर्ण पत्ता दर्शनी भागात संबंधितांनी नमूद करणे आवश्यक आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी म्हटले आहे, निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी म्हणून भारत निवडणूक आयोगाकडून विविध निर्देश देण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक कालावधीत पत्रके, भित्तीपत्रके इत्यादींची छपाई करण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127-क प्रमाणे पुढीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच पॉम्फलेट, पोस्टरची छपाई करताना लोकप्रतिनिधीत्व पुस्तिका 1951 मधील 127- ए प्रमाणे प्रत्येक मुद्रकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही व्यक्तीकडून निवडणुकीशी संबंधित कुठलीही छपाई, प्रसिध्दी पॉम्फलेट, पोस्टरची छपाई करावयाची झाल्यास त्यावर मुद्रक, प्रकाशक (Printer & Publisher) चे नाव व संपूर्ण पत्ता दर्शनी भागात नमूद करणे आवश्यक आहे. तसेच प्रतींची संख्या नमूद करावी. मुद्रक व प्रकाशकाने अशी प्रसिध्दी करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडून त्यास ओळखत असलेल्या दोन व्यक्तींच्या समक्ष व त्यांच्या साक्षांकनासह त्यांच्याकडून दोन प्रतीत घोषणापत्र घेतल्याशिवाय मुद्रीत करू नयेत. तसेच अशाप्रकारची प्रसिध्दी, छपाई केल्यावर घोषणापत्राची एक प्रत, पोस्टर, पॉम्फलेटच्या चार प्रती जिल्हादंडाधिकारी कार्यालय, धुळे येथे सादर कराव्यात.

धुळे जिल्ह्यातील सर्व प्रकाशक आणि मुद्रकांनी निवडणुकीशी संबंधित साहित्य प्रकाशित करताना दक्षता घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा