महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः केली तपासणी नाक्याची तपासणी सोमवार, २३ मार्च, २०२०


 

सिंधुदुर्ग : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज स्वतः वैभववाडी येथील तपासणी नाक्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहे याची तपासणी केली. यासाठी त्यांनी त्यांच्या अंगरक्षकास साध्या गाडीतून पुढे पाठवले व स्वतः मागे थांबले. अंगरक्षकाला पोलिसांना मुद्दामहून जाणारच असे सांगण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

त्याप्रमाणे हा अंगरक्षक साध्या गाडीने चेकपोस्टवर पोहोचला. त्यास नियमाप्रमाणे पोलिसांनी थांबलले व त्याची तपासणी केली. त्यानंतर त्यास आपण जिल्ह्यात पुढे जाऊ शकत नाही असे सांगितले. त्यावर त्या अंगरक्षकांने आपण जाणारच असे सांगितले तरी पोलिसांनी कोणतेही दडपण न घेता त्यास पुढे जाण्यास परवानगी नाकारली.  यानंतर स्वतः पालकमंत्री श्री.सामंत या ठिकाणी आले व पोलीस करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.  पोलीस व आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. अशाच प्रकारे यंत्रणांनी काम करावे असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना विषयी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला.      

तरी नागरिकांनीही सध्याच्या परिस्थितीमध्ये घरा बाहेर न पडता सहकार्य करावे अन्यथा कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा