महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
परिवर्तनाच्या कथा सांगणारा लोकराज्य प्रेरणादायी - पालकमंत्री विष्णू सवरा मंगळवार, ०९ ऑक्टोंबर, २०१८
पालघर : लोकराज्यचा ऑक्टोबर महिन्याचा विशेषांक महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या यशकथा सांगणारा असल्याने याद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. सर्वांनी हा अंक आवर्जून वाचावा, असे आवाहन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ऑक्टोबर महिन्याचा लोकराज्यचा अंक हा ‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ सांगणारा विशेषांक आहे. याचे पालघर जिल्ह्यातील प्रकाशन पालकमंत्री श्री.सवरा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित कुंभार, वसुमना पंत, पालकमंत्री यांचे स्वीय सचिव महेश देवरे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आदी यावेळी उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या यशकथांचा समावेश असलेल्या लोकराज्यच्या या अंकाचे अतिथी संपादक अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे आहेत. या अंकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर विशेष लेख लिहिला आहे. विविध जिल्ह्यांमधील यशकथांवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयामार्फत लिहिण्यात आलेल्या लेखांचा समावेश या अंकात आहे. पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘कम्युनिटी वर्कशॉप’ अंतर्गत जव्हार येथे सुरू असलेल्या शिलाई मशीन प्रशिक्षण आणि रोजगार केंद्राच्या यशकथेचाही यामध्ये समावेश आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन ज्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आले आहे, अशा बदलांना टिपणारा हा विशेषांक आहे. आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या या यशकथा इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील. जास्तीत जास्त नागरिकांनी लोकराज्यचा महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा हा अंक घेऊन अवश्य वाचावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यावेळी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा