महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रगतीशील जीवन म्हणजे करिअर- देवेंद्र भुजबळ शुक्रवार, १४ जुलै, २०१७

अहमदनगर : अलिकडच्या काळात समाज बदलतोय. स्थित्यंतर घडत आहेत. त्यास सामोरे जाताना अनेकांचे मानसिक संतुलन जाऊन ती खचतात. जीवनात अंधार दिसू लागतो. नाउमेद न होता स्वतःला सावरून कुटूंबियांचा आणि समाजाचा आधार होणारेच करिअर म्हणजे काय ? हे कृतीतून दाखवून देतात. गलेलठ्ठ पगाराची नोकरी वा भरपूर पैसे देणारा व्यवसाय म्हणजे करिअर नव्हे तर अनेकांचा आधार ठरणारे प्रगतीशील जीवन म्हणजेच करिअर होय, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले.

पद्मगंगा फाऊंडेशनतर्फे स्व.प्रा.डॉ.गंगाधर मोरजे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित दशवार्षिक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अशोक देशमाने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.दिनकर कुलकर्णी, प्राचार्य वसंत बिराजदार, श्रीराम गालेवाड व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.धोंडीराम वाडकर उपस्थित होते.

श्री.भुजबळ म्हणाले, गगनभरारीचे ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे प्रकाशन झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यातच पहिली आवृत्ती संपली. गुरूंच्या स्मृतीदिनी, गुरूपौर्णिमेला आणि माझे महाविद्यालयीन शिक्षण झालेल्या नगरमध्ये द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. याचवेळी या पुस्तकास पहिला राज्यस्तरीय पुरस्कार मिळतो आहे. गगनभरारीत उल्लेख असलेल्या बेबीताई गायकवाड व डॉ. शारदा महांडुळे या येथे उपस्थित आहेत. त्यामुळे हा सोहळा माझ्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहिल. गगनभरारीमधील व्यक्तीरेखा बदलास सामोरे जात असलेल्या समाजाच्या शिल्पकार आहेत. त्यांच्या यशामागील कार्य समाजाला सतत उमेद देत राहिल.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, पदरमोड करत गुरूंचा स्मृतीदिन सातत्याने साजरा करणारे प्रा. वाडकर यांचे कार्य आदर्शवत आहे. मोरजे मठीमुळे नगरमध्ये लोकसाहित्याचे संशोधन करणारांची मोठी फळी निर्माण होऊन नगरला लोकसाहित्याच्या विद्यापीठाचा मान मिळाला. अहमदपूर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या लोकसाहित्याच्या राष्ट्रीय चर्चासत्रास प्रा.डॉ.गंगाधर मोरजे हे सपत्निक आले होते. तेथे आमचा पहिला परिचय होऊन पुढे वृद्धींगत झाला. लोकसाहित्य हा त्यांचा अभ्यास विषय होता. लोकसाहित्य ही प्रयोगशील कला असून लोकसाहित्य संशोधन मंडळाची धुरा प्रा. डॉ. वाडकर, प्रा. डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, मिलिंद चवंडके, प्रा. डॉ.मच्छिंद्र मालुंजकर आदि मंडळी समर्थपणे सांभाळत आहेत, याचे कौतुक वाटते.

डॉ.देशमाने म्हणाले, प्राचीन व अर्वाचीन संत साहित्य समाजमन घडविण्याचे काम करते. माणसाचे मन समृद्ध करून त्यास माणूस म्हणून जगायला शिकवण्याचे काम साहित्य करते. साहित्यिकांचा गौरव सलग दहा वर्षे करण्याचे काम पद्मगंगा फाऊंडेशनने केले आहे. माणसांच्या मनावर ग्रंथच संस्कार करत असतात. नटसम्राट वाचला नाही तर म्हातारपणाचे दुःख समजत नाही. कमर्शिअल टिचर व कमर्शिअल विद्यार्थी यांना गुरू-शिष्याचे नाते कळणार नाही, असे सांगत भारतीय संस्कृतीतील शिक्षण पद्धती आजच्या संगणक युगातही प्रभावी ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डॉ. वाडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परीक्षक म्हणून काम केलेल्या पत्रकार व समीक्षक मिलिंद चवंडके, कवी मधुकर दिवाण आणि प्रा.विठ्ठल बरसमवाड यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षकांच्यावतीने बोलताना श्री.चवंडके म्हणाले, फाऊंडेशनचा हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा असला तरी या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्याबाहेरील साहित्यिकांचेही साहित्य येत आहे. या दर्जेदार साहित्यामधून पुरस्कारासाठी निवड करताना कस लागतो. विविध साहित्य प्रकारामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉ.वाडकर यांच्याविषयीच्या `लोकाविष्कार`आणि देवेंद्र भुजबळ लिखित `गगनभरारी`च्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनानंतर पुरस्कार सोहळा झाला. प्रा.डॉ. दिनकर कुलकर्णी (पुणे) यांना लोकगंगा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवेंद्र भुजबळ (मुंबई), प्राचार्य वसंत बिराजदार (अहमदपूर), श्रीराम गालेवाड (पुणे), प्रा. सुदाम पवार (नगर) व संगीता होळकर-औटे (कडा, ता.आष्टी) यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दयाराम पाडलोस्कर (पेडणे-गोवा) यांच्यावतीने दत्ता खोजे यांनी पुरस्कार स्वीकारला.

श्रीराम गालेवाड यांनी समाजकार्य करताना आलेले अनुभव मिश्किल शैलीत निवेदन करून हास्याची कारंजी फुलवली. उद्धव काळापहाड व ललिता उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. फाऊंडेशनचे सेक्रेटरी डॉ.ज्ञानेश आयतलवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.डॉ.मच्छिंद्र मालुंजकर, प्रा.डॉ.माहेश्वरी गावित, प्रा.डॉ.वर्षा कीर्तने, विठ्ठल शहापूरकर, सुनिल महाजन, दिलीप शहापूरकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्ती सहकुटूंब उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा