पालघर : स्वामी विवेकानंद यांनी 21 व्या शतकात भारत महासत्ता बनेल, असे भाकीत वर्तविले होते. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात देश खऱ्या अर्थाने बलशाली बनण्यास सुरुवात झाली आणि आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत भारताला सामर्थ्यशाली करीत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाडा येथे झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. हा पुतळा स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय प्रांगणात उभारण्यात आला आहे.
याप्रसंगी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार राजेंद्र गावित, खासदार कपिल पाटील, आमदार पास्कल धनारे, आमदार शांताराम मोरे, विवेक पंडित, वाडा नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर यांची उपस्थित होती.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, अटलजी केवळ विचारवंत नव्हते तर त्यांनी देशाला कणखर आणि कल्पक नेतृत्व दिले. भारताला जगात एक गरिबांचा देश, दुर्बल देश समजले जायचे, एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली पोखरणचा अणुस्फोट करून अटलजींनी हा समज दूर केला. कारगिलच्या वेळीही आधी मैत्रीचा हात पुढे केला पण पाकिस्तानची आगळीक सुरूच राहिल्याने धडाही शिकविला. संयुक्त राष्ट्रातही त्यांनी भारताची बाजू दमदारपणे मांडली. त्यावेळी ते विरोधी पक्षात असले तरी त्यांनी देशाला पहिले प्राधान्य दिले
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अटलजींनी पंतप्रधान असताना 5 लाखांपेक्षा जास्त गावे, खेडी रस्त्यांनी जोडली. रस्ते आणि महामार्गांशिवाय विकास होऊ शकत नाही ही दूरदृष्टी त्यांनी ठेवली त्यामुळेच आज आपण याबाबतीत आज एवढी प्रगती करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करीत असून वाडा, पालघर सारखे भाग उत्तम दळणवळणाने जोडत आहोत. पालघर जिल्हा एकेकाळी कुपोषणासाठी कुप्रसिद्ध होता, मात्र आता आम्ही अनेक चांगले कार्यक्रम, योजना आखून कुपोषण कमी केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामीजींच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात उभारण्यास सुरुवात केली असून जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये आपला देश लवकरच येईल, अशी खात्रीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
तत्सम नागरिक होण्यासाठी शिक्षणाच्या जोडीने कला, सांस्कृतिक, खेळ यामध्ये देखील प्रगती केली पाहिजे आणि शिक्षक संचलित शिक्षण संस्था यात आघाडीवर असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापन मंडळाचे अभिनंदन केले
मान्यवरांचा सत्कार
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश अरोरा, ओमप्रकाश शर्मा, सरचिटणीस भरत जानेफळकर, प्राचार्य नारायण फडके, जयवंत वाडेकर, देवदत्त लेले आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
असा आहे पुतळा
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा 5 फुटाचा असून मकराना येथील संगमरवरी दगडापासून तयार केला आहे. संपूर्ण स्मारक ग्रॅनाईटमध्ये असून एकूण घुमटापासून पायथ्यापर्यंत 11 फूट उंचीचे आहे. घुमटासाठी धोलपूर येथील लाल दगड आणि पायथ्याला दक्षिण भारतातील काळे ग्रॅनाइट मार्बल वापरले आहे.
हा सुंदर पुतळा अजमेरच्या कैलास अग्रवाल आणि त्यांच्या कारागिरांनी 3 महिन्यात जयपूर येथे तयार करून वाडा येथे आणला.