महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
व्यक्तिमत्व विकास व आत्मविश्वास वाढविण्यावर युवकांनी भर द्यावा - पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कॉलरशिप, माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता चमकते पण स्पर्धा परीक्षेत मात्र जिल्ह्यातील युवक मागे पडतात असे चित्र आहे. तथापि व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याबरोबरच आत्मविश्वास बळकट केल्यास स्पर्धा परीक्षेतही भरघोस यश मिळवता येते यासाठी या दोन्ही बाबींवर युवक- युवतींनी भर द्यावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस विभागाचे निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी पणदूर येथे आयोजित युवक मेळाव्यात केले.

नेहरु युवा केंद्र व पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जंयती व युवा सप्ताह शुभारंभ कार्यक्रमात श्री.काईंगडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर होते. जिल्हा नियोजन अधिकारी विकास पाटील, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या राजश्री सामंत, नेहरु युवक केंद्राचे समन्वयक सहदेव पाटकर, वसंत कदम, सुदर्शन खांदारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डी.वाय डाफळे तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या जिल्ह्यात गुणवान विद्यार्थी किंवा गुणवत्तेची कमतरता नाही असे सांगुन श्री.काईंगडे म्हणाले की, या गुणवत्तेचा पुरेपूर वापर होऊन स्पर्धा परीक्षेत हमखास यशासाठी सुयोग्य मार्गदर्शनाची गरज आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी, मुलाखतीची तयारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, व्यक्तीमत्व विकासाला पूरक गोष्टी, व्यायामाचे महत्व आदी बाबत सविस्तर विवेचन त्यांनी केले. तसेच सोशल मीडियाचा वापर सिमीत करावा असे आवाहनही केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मिलिंद बांदिवडेकर यांनी वाचनाचे महत्व विशद केले. मन स्थिर राहण्यासाठी तसेच शरीरसंपदा हिच खरी संपत्ती आहे. या अनुषंगाने युवकांनी आपली दैनंदिन वाटचाल कशी सुसंग ठेवावी याचे विवेचन केले. यावेळी श्रीमती राजश्री सामंत यांचेही समयोचित भाषण झाले.

यावेळी घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक आत्माराम पवार, द्वितीय क्रमांक गौरव कांबळी, तृतिय क्रमांक पुंडलिक कुवळेकर यांना प्राप्त झाला आहे. प्रारंभी प्राचार्य डी. वाय. डाफळे यांनी स्वागत केले तर शेवटी नेहरु युवा केंद्राचे समन्वयक सुदर्शन खांदारे यांनी आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा