महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चांदा ते बांदा अंतर्गत 16 रोजी भव्य प्रदर्शन मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाकांक्षी चांदा ते बांदा योजने अंतर्गत भव्य प्रदर्शनाचे दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये दिली.

कुणकेश्वर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत चांदा ते बांदा या योजनेविषयीची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी श्री.केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विकास पाटील, आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यान्वीत यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये या योजनेतील लाभार्थ्यांना स्वतः पालकमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेळी पालन, कुक्कुट पालन, केज फार्मिंग, क्रॅब फार्मिंग, मत्स्यव्यवसाय, डेअरी उत्पादन, चारा उत्पादन या चांदा ते बांदा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा समावेश आहे. तसेच भात उत्पादक शेतकरी, मेंढी पालन यांचाही विशेष समावेश असेल. या योजनेची माहिती जिल्ह्यातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. बिगर लाभार्थींना या योजनेची माहिती मिळावी व लोकांचा सहभाग वाढावा या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना कार्यान्वित यंत्रणेला यावेळी श्री.केसरकर यांनी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा