महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
केंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्य बीज उपलब्ध करुन द्यावे - अर्जुन खोतकर शुक्रवार, १२ जुलै, २०१९

नवी दिल्ली : राज्यातील मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने ब्राझीलसह अन्य देशातील उत्तम परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी  आज केली.

श्री.खोतकर यांनी आज कृषी भवन येथे  केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी मत्स्य व पशुधन विषयक बाबींवर चर्चा केली व काही मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

महाराष्ट्राला 720 किमीचा  समुद्र किनारा लाभला असून  मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मासेमारी उद्योगातून राज्याला मोठा महसूलही मिळतो. उत्तमोत्तम मत्स्यबीज उपलब्ध झाल्यास मत्स्य उत्पादनात वाढ होवून महसुलातही वाढ होणार आहे. त्यासाठी राज्याला ब्राझीलप्रमाणे अन्य देशातील उत्तम परदेशी मत्स्य बीज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी याबैठकीत श्री.खोतकर यांनी केली. यास सकारात्मकता दर्शवत ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन गिरीराज सिंह यांनी यावेळी दिले.  

मिरकरवाडा मच्छीमारी बंदराला प्रशासकीय मान्यता द्यावी

रत्नागिरी जिल्‌ह्यातील  मिरकरवाडा  मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील पायाभूत सुविधांच्या कामाला  सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी यावेळी श्री.खेातकर यांनी केली. 2016 मधील पावसाने नुकसान झाल्यामुळे मिरकरवाडा बंदराच्या कामाचे अंदाजपत्रक आता 94.79 कोटी रुपये झाले आहे.  तसेच, कोकणातील आनंदवाडी आणि कारंजा मच्छीमार बंदराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्राकडून आतापर्यंत 12 कोटी आणि नंतर 23 कोटींचा  निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी मिळावा अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय गोकुल मिशन, जनावरांच्या पायाचे व तोंडाचे आजार नियंत्रण कार्यक्रमा संदर्भात राज्य शासनाने तयार केलेल्या कृती आराखड्यास मंजुरी  मिळावी, प्राण्यांच्या आजारावर नियंत्रण करण्‍यासाठी आखण्यात आलेल्या राज्य शासनाच्या कार्यक्रमास आर्थिक मदत करणे आणि राष्ट्रीय पशुधन कार्यक्रमांतर्गत राज्याला निधी उपलब्ध करुन देणे आदी मागण्या श्री.खोतकर यांनी या बैठकीत केल्या. यास सकारात्मकता दर्शवत या मागण्या पूर्ण  करु असे आश्वासन श्री. गिरीराज सिंह यांनी यावेळी दिले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा