महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोल्हापूर विमानतळावर नाईट लॅडींग सुविधेसह कार्गो हब विकसित करू - केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू शनिवार, ०२ फेब्रुवारी, २०१९

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लँडींग सुविधेसह कार्गो हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केली.

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल इमारत आणि एटीसी टॉवरचे रिमोट कंट्रोलद्वारे भूमिपूजन केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती,  खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजयकाका पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर सरिता मोरे, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील,दैनिक पुढारीचे मुख्य संपादक  पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, विमानसेवा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ. एन.के.शुल्का, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते. 

कोल्हापूर विमानतळ 750 एकरावर अतिशय दर्जेदारपणे विकसित होत असून शेजारीच कार्बोहब विकसित करून येथील उद्योजकांची, शेतकऱ्यांची व अन्य घटकांची निश्चितपणे सोय होऊन कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करून नागरी हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर येथे मोठी विमाने उतरतीलच तसेच जागतिक स्तरावरील सर्व सुविधा या विमानतळावर उपलब्ध करून देऊ. छत्रपती राजाराम महाराजांनी सुरु केलेल्या विमानतळाचा निश्चितपणे लौकीक वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची घोषणा करून नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, कोल्हापूर विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारे तसेच राजर्षि छत्रपती  शाहू महाराजांच्या समाजिक परीवर्तनाच्या कार्याची माहिती देणारे तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची महती देणारे दर्जेदार संग्रहालय उभे केले जाईल, यासाठी केंद्र व राज्य शासन निश्चितपणे पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले.

कोल्हापूरचे विमानतळ पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करून  नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, केंद्र शासनाने देशात विमानसेवेला प्राधान्य दिले असून भारताने विमान सेवेमध्ये जगात गौरव निर्माण केला आहे. आज देशात 101 विमानतळ असून त्यांचा विकास करण्यास प्राधान्य दिले आहे. आज विमाने पाण्यावर उतरण्याची नवी योजनाही आखली आहे. उड्डाण योजनेंर्गत सर्वसामान्य मानसासाठी हवाईसेवा उपलबध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. उड्डाण-3 अंतर्गत 235 ठिकाणी विमानसेवा सुरू होईल. आता देशांतर्गत सेवेबरोबरच राज्यातूनही आंतरराष्ट्रीय सेवाही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल. राज्यात रस्ते, रेल्वे, विमानसेवा, जलसेवेद्वारे दळणवळणाच्या नवनव्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने 30 टक्क्याचा हिस्सा म्हणून 84 कोटी रूपयाचा निधी दिला असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर विमानतळावर पार्कींग हब  आणि कार्गो हब सुरू व्हावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात विमानसेवा सुरू करावी, असे मत त्यांनी व्यक्त  केले.

याप्रसंगी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी, विमानसेवा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ. एन.के.शुल्का यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.विमानतळ संचालक कमलकुमार कटारीया यांनी आभार मानले. समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक,नागरिक उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा