महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी सरकार कटिबद्ध - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवार, ०४ ऑगस्ट, २०१८
शिर्डी : रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसह बैठक आयोजित करुन सकारात्मक मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

शिर्डी येथे रेडिओलॉजिस्ट ॲण्ड इमेजिंग असोसिएशनच्या राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन अर्थमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.के.मोहनन, डॉ.अमरनाथ, डॉ.रवी आलुलवार, डॉ.अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ.गिरीष महिंद्रकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री.मुनगंटीवार म्हणाले, पीसीपीएनडीटी कायद्यातील काही तरतुदीमुळे निरपराध डॉक्टरांना त्रास होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यासह बैठक आयोजित करुन, योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देतांनाच रेडिओलॉजिच्या एकूण प्रक्रियेत महिला तज्ज्ञांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्यविषयक सेवाही वाढल्या आहेत. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानली जाते. यासाठी समाजपरिवर्तनामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे ठरते. रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या या तीन दिवसीय चर्चासत्रातील चिंतन व त्या सर्व ज्ञानाचा लाभ समाजाला व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मागण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातील रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा