महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मंठा व परतुर तालुके हरित करण्यासाठी अधिकाधिक वृक्षांची लागवड करा - पालकमंत्री बबनराव लोणीकर शुक्रवार, ०५ जुलै, २०१९


जालना : वृक्षाला मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक ग्रंथांमधून वृक्षांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेला प्राणवायु पुरविण्याबरोबरच पाऊस पाडण्यामध्येही वृक्षांची फार मोठी भूमिका आहे. दुष्काळापासुन कायमची मुक्ती होऊन मानवी जीवन सुकर होण्यासाठी प्रत्येक कुटूबांने किमान दोन वृक्षांची लागवड करुन आपल्या मुलांप्रमाणे त्यांचे संगोपन करावे. तसेच मंठा व परतूर तालुके हरित करण्यासाठी अधिकाधिक वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

३३ कोटी वृक्ष लागवडी संदर्भात आज दि. ५ जुलै रोजी मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर भुजंगराव गोरे, गणेशराव खवणे, संदीप गोरे, राजेश मोरे, नाथाराव काकडे, कैलास बोराडे, संभाजी खंदारे, नागेश घारे, दत्ताराव कांगणे, विठ्ठलराव काळे, माऊली वायाळ, अविनाश राठोड, महादेव बाहेकर, प्रसाद गडदे, नरसिंह राठोड, अन्साबाई राठोड, उप विभागीय अधिकारी श्री ढवळे, तहसिलदार श्रीमती सुमन मोरे आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. लोणीकर म्हणाले, मराठवाड्यात सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला निसर्गाला दोष देऊन चालणार नाही तर या परिस्थितीला आपणच कारणीभुत आहोत. वृक्षतोडीमुळे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. तसेच भूगर्भामध्ये असलेल्या पाण्याच्या अतिउपशामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. मराठवाड्याचा कायमचा दुष्काळ संपविण्यासाठी तसेच मराठवाड्याला पाणीदार करुन मराठवाड्याला हरितक्रांतीकडे नेण्यासाठी जुलै ते सप्टेंबर या काळात उद्दिष्टापेक्षा अधिकची वृक्ष लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांनी वृक्षलागवड मोहिमेत अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

३३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत जालना जिल्ह्याला १ कोटी ५ लक्ष वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी सर्व शासकीय विभागांना उद्दिष्ट ठरवुन देण्यात आलेले आहे. विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट प्रत्येक विभागाने पुर्ण करावे. त्याचबरोबरच रोपण केलेल्या वृक्षांची निगा राहील याची दक्षता घ्यावी. विभागांमार्फत रोपण करण्यात आलेल्या वृक्षांचे परीक्षण करण्यात येणार असुन यामध्ये हयगय करणाऱ्या विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा