महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिवनी येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्य संतोषजनक- डॉ. रणजित पाटील मंगळवार, ११ जून, २०१९सर्वांसाठी घरे ही संकल्पना शिवनी येथील म्हाडा कॉलनीत साकार

अकोला : गरजू नागरिकांना हक्काची घरे मिळावीत. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी पूर्ण व्हावा. यासाठी शासन सर्वांसाठी घरे ही संकल्पना जोमाने राबवित आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अकोला महानगरातील म्हाडातर्फे बांधण्यात येत असलेल्या शिवनी येथील अकरा एकरमधील दोन एकरात साकारत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्य उत्कृष्ठ असून राज्य शासन हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले. 

शिवनी येथील म्हाडा अंतर्गत अंतिम टप्प्यात पूर्णत्वास असणाऱ्या 255 घरकुल परिसरात डॉ. पाटील यांनी सोमवारी भेट देऊन प्रकल्पाचा आढावा घेत म्हाडा अधिकारी, कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या संदर्भात निर्देश दिले. या प्रकल्पाच्या 9 इमारतीपैकी 3 इमारतीमधील 84 घरे पूर्णत्वास गेली असून त्यांचा ताबा येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व आधुनिक नागरी सुविधायुक्त असणाऱ्या या प्रकल्पाचे भूमिपूजन एप्रिल 2017 झाले. नोव्हेंबर 2017 मध्ये मनपाने नकाशे मंजूर केले. डिसेंबर 2017 अंती कामास प्रारंभ झाला. हा प्रकल्प पूर्ण होण्याची तिथी जानेवारी 2020 असून आतापर्यंत वित्तीय अडचणी या प्रकल्पाला आल्या होत्या. एकूण प्रकल्पाच्या 30 टक्के निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला होता. डॉ.पाटील यांनी वित्तीय तरतुदींसंदर्भात मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करून, तीन बैठका घेऊन या अडचणींचे निरसन केले. तसेच घराच्या किमती संदर्भातही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी कसोशीने लक्ष देऊन मंत्रालयीन स्तरावर यासंदर्भात बैठक आयोजित करून या घरकुलांच्या किंमती कमी करून घेतल्या. 

एक बेडरूम, हॉल, किचन असे एकूण 445 चौरस फूट प्रत्येक घरकुलाचे बांधकाम झाले आहे. प्रत्येक इमारतीत दोन स्वतंत्र जीणे उभारण्यात आले आहेत. या घरकुलाच्या संदर्भात म्हाडाने अर्ज आमंत्रित केले असून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होऊन पात्र लाभार्थ्यांना ही घरकुले अलॉट करण्यात येणार असल्याचे म्हाडा अधिकारी यांनी यावेळी सांगितले. निसर्गरम्य वातावरणात अगदी मलकापूरला लागून असणाऱ्या या प्रकल्पात खेळाचे मैदान, दिवाबत्ती, पक्का रस्ता, पाणी, समाज भवन आदी नागरी सुविधांची उपलब्धता राहणार आहे. 

डॉ. पाटील यांनी या प्रस्तावित म्हाडा कॉलनीत फेरफटका मारून कॉलनीची पाहणी केली. तसेच सॅम्पल फ्लॅट बघून समाधान व्यक्त केला. शासनाने उल्लेखित केलेल्या सोई प्रस्तावित घरकुलात प्रत्येक लाभार्थ्याला उपलब्ध करून निर्धारित मुदतीत घरकुलांची कामे त्वरित करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी बजावले. डॉ.पाटील यांच्या हस्ते यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी म्हाडा उपअभियंता अजवानी, प्रकल्प अभियंता बोरोडे व प्रकल्प सल्लागार, अभियंता पंकज कोठारी आदी उपस्थित होते. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा