महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ग्रामविकासाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीने गावांचा कायापालट करावा - दादाजी भुसे शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
बुलडाणा : ग्राम विकास विभागाच्या योजनांद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावांचा कायापालट करावा, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध योजना, विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमा तायडे, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अमरावती विभागाचे उपायुक्त (विकास) राजाराम झेंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी नेमाने, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जालींधर बुधवत आदी उपस्थित होते.

संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र 31 मार्च पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत राज्यमंत्री दादाजी भुसे म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यातील 632 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून अजून 237 ग्रामपंचायती बाकी आहेत. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना यंत्रणेनी शौचालय उभारणीला गती द्यावी. शौचालय बांधकामाचा दर्जा निकृष्ट राहणार नाही याची काळजी घ्यावी. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत ब आणि क वर्ग दर्जा असलेल्या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मंजूर असलेली कामे पूर्ण करावी.

ते म्हणाले, सर्व शिक्षा अभियानातंर्गत मंजूर असलेल्या वर्गखोल्या पूर्ण करण्यात याव्यात. जिल्ह्यात नादुरूस्त, कौल निघालेले शाळा खोल्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी. जिल्ह्यात 1442 एकूण शाळांपैकी 906 शाळा डिजिटल झालेल्या आहेत. उर्वरित शाळा 31 मे 2018 पर्यंत डिजिटल करण्यात याव्यात. यामध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायत आपल्या गावातील शाळा डिजिटल करू शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीनी पुढाकार घ्यावा. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेमधील निधी 100 टक्के खर्च करण्यात येऊन या घटकाला मागासलेपणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत.

लाळ्या खुरकत लस मिळण्यास विलंब असल्यास तोंडखूरी, लाळ्या खुरकत रोगांचा प्रादूर्भावग्रस्त भागात उपाययोजना कराव्यात. जेणेकरून हा रोग फैलवणार नाही. पशुसंवर्धन विभागाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील घटकांसाठी दुधाळ जनावरे, शेळीवाटप पूर्ण करून लाभार्थ्यांना डिबीटीद्वारे अनुदान वितरीत करावे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून बुलडाणा जिल्ह्याला 700 किलोमीटरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात 2018-19 चे नियोजन पूर्ण करून गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात यावे. या योजनेतून कंत्राटदारावर 5 वर्ष देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामुळे दर्जेदार रस्ता निर्मिती करावी. मनुष्यबळ कमी असलेल्या ग्रामपंचायतींनी मानधन तत्वावर आपल्या स्तरावर कर्मचारी नियुक्त करावे.

कृषी विभागाकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, पीक संरक्षण, राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम, आरोग्य विभागाकडील योजनांचाही राज्यमंत्री यांनी यावेळी आढावा घेतला. राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेचा दुर्देवाने अपघात झाल्यास विद्यार्थ्यांना लाभ द्यावा. तसेच विद्यार्थी शालेय आरोग्य तपासणी करण्यात येवून गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीचे संचलन व आभार उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे यांनी केले. बैठकीला जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा