महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
केंद्रीय पथकाने केली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९
शिर्डी : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र, केंद्रीय वित्त मंत्रालय विभागाचे सल्लागार दिना नाथ यांनी आज जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी,अस्तगाव, बाभळेश्वर, श्रीरामपूर तालुक्यातील दिघी, संगमनेर तालुक्यातील सादतपूर व जवळे कडलग येथील शिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.

पथकातील अधिकाऱ्यांनी राहाता तालुक्यातील साकुरी येथील शेतकरी अरुण काशिनाथ उपाध्ये यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची, अस्तगाव येथील प्रविण लक्ष्मण गोर्डे यांच्या मका पिकाची, वाकडी येथील संजय निवृत्ती मोरे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील रखमाजी यशवंत पठारे यांच्या शेतातील मका पिकाची पाहणी केली. बाभळेश्वर येथील विजय रघुनाथ इनामके यांच्या मका पिकाची व चंद्रभान पांडुरंग देठे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील लक्ष्मण महिपती बोरसे यांच्या बाजरी पिकाची पाहणी केली. जवळे कडलग येथील पृथ्वीराज एकनाथ सुर्वे यांच्या द्राक्ष पिकांची पाहणी केली.

यावेळी डॉ. सुभाष चंद्र व श्री. दिना नाथ यांनी सांगितले, की पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल. तसेच पिकांची पाहणी करताना शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पथकातील अधिकाऱ्यांना माहिती देताना शेतकऱ्यांनी सांगितले की, ऐन पीक काढणीच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्याचबरोबर अद्यापही काही ठिकाणी जमीन ओलसर असल्यामुळे रब्बी हंगाम घेण्यातही अडचण येत आहे. उभ्या पीकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांनी लवकरात लवकर मदत मिळण्याची विनंती केली. यावेळी महसूल, कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच भेट दिलेल्या ठिकाणी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, या पीकांचे जिल्ह्यातील 6 लाख 34 हजार 33 शेतकऱ्यांचे 4 लाख 54 हजार 12 हेक्टर क्षेत्राचे सुमारे 475 कोटी 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती यावेळी पथकाला देण्यात आली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा