महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रियदर्शिनी सभागृह चंद्रपूरच्या सांस्कृतिक वैभवाला शिखरावर घेऊन जाईल - सुधीर मुनगंटीवार शुक्रवार, १४ जुलै, २०१७

• देखण्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण थाटात संपन्न

चंद्रपूर: चंद्रपूरच्या सांस्कृतिक चळवळीने, नाट्य निर्मितीने महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहाच्या अत्याधुनिक सुविधा नव्या युगाच्या स्पर्धेत वेगाने पुढे जाण्यासाठी पूरक ठरतील. चंद्रपूरचा ठसा कला क्षेत्रात ठसठसीतपणे उमटवेल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ना.मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते सभागृहाच्या नुतनीकरणासोबतच भारतरत्न लता मंगेशकर कलादालनाचे लोकार्पण सुद्धा यावेळी झाले. प्रसिद्ध इतिहासतज्ञ अशोकसिंह ठाकूर यांनी या ठिकाणी नाणेसंग्रालय उभारले आहे. त्यांच्या योगदानाचा गौरवोल्लेख ना. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात केला. या कलादालनामध्ये प्राचीण काळातील नाण्यांचा संग्रह असून देश-विदेशातील नाणे, मुद्रा प्रमुख आकर्षण आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नाना शामकुळे होते. मंचावर आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुरेश धानोरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, नागपूर विद्युत मंडळाचे अधिक्षक अभियंता रविंद्र आकुलवार, मुख्य अभियंता (प्रादेशिक विभाग) उल्हास देबडकर, कार्यकारी अभियंता उदय भोयर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपमहापौर अनिल फुलझेले आदींची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री यांनी चांदा ते बांदा असणाऱ्या राज्यात चांदा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहावे, ही अपेक्षा केली. राज्याच्या उर्जेचा स्त्रोत आम्ही आहोत. सर्वाधिक जंगल क्षेत्राचे प्रतिनिधीत्व आम्ही करतो. उद्या नाट्य क्षेत्रातील सर्वच पुरस्कार चंद्रपूरला मिळाले तर आश्चर्य वाटणार नाही. मूल येथे नाट्यगृह आहे. झाडीपट्टीच्या नाट्य चळवळीचे केंद्रस्थान असणाऱ्या वडसादेसाईगंज येथे नाट्यगृह उभारले जाईल. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपूरी व आमदार सुरेश धानोरकर यांच्याही मतदार संघात नाट्यगृह उभारले जाईल. नाट्य चळवळीला गती आणण्याचा हा प्रयत्न असून त्यासाठीच या मुख्य नाट्यगृहाला आधुनिक स्वरुप दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्हयाच्या विविध विकासाचा आढावा मांडला.

आमदार नानाजी शामकुळे यांनीही संबोधित केले. ते म्हणाले, सुधीर मुनगंटीवार म्हणजे शब्दाला जागणारा नेता आहे. त्यांनी विकासासंबंधी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला आहे. त्याचाच परिपाक आजचे नुतन प्रेक्षागृह आहे. त्यांच्या नेतृत्वात यावर्षी पुन्हा एकदा विक्रमी वृक्षलागवड झाली. प्रत्येक कार्य ईश्वराची पूजा समजून करणारे सुधीरभाऊ महाराष्ट्राचे भूषण असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता उदय भोयर यांनी तर संचालन गायत्री देशपांडे यांनी केले. आभार मनोज जुनोनकर यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा