महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शहीद जवान खैरनार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
नंदुरबार : जम्मू-काश्मिरमधील बांदीपुरा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले भारतीय वायुदलाच्या गरुड पथकातील जवान मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर सायंकाळी बोराळे, ता. नंदुरबार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिलिंद खैरनार यांचे पार्थिव आज सकाळी ओझर, जि. नाशिक येथील विमानतळावर आणण्यात आले. यावेळी वायुसेनेच्या जवानांनी मानवंदना दिली. त्यानंतर पार्थिव सायंकाळी बोराळे या त्यांच्या गावी आणण्यात आले. मिलिंद खैरनार यांचे पार्थिव सुरूवातीला त्यांच्या घरी आणण्यात आले. तेथे ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे बंधू मनोज खैरनार यांनी शहीद मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवाला अग्नि दिला.

पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार शिरीष चौधरी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय वायुदलाच्या जवानांनी शहीद मिलिंद खैरनार यांना मानवंदना दिली. शहीद मिलिंद खैरनार यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पालकमंत्री श्री. रावल यांनी शोक भावना व्यक्त केल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा