महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तपासून घ्या तीन गोष्टी… कुष्ठरोगापासून मिळेल मुक्ती बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
लेख

प्रधानमंत्री प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यातील 22 जिल्ह्यात व 234 तालुक्यात 5 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जळगाव जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात आजपासून कुष्ठरोग शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेच्या निमित्ताने …

कुष्ठरोग या आजाराविषयी समाजात फारसे चांगले मत व्यक्त केले जात नाही. कुष्ठरोग म्हणजे नेमका काय आजार आहे, त्याची लक्षणे काय आहेत किंवा तो आजार होण्यामागची कारणे काय आहेत, याची प्राथमिक माहिती नागरिकांना नसते. या आजाराबाबत फारशी जनजागृती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कुष्ठरोगाबाबत काही चुकीचे प्रघात, काही गैरसमज असल्याचे आढळून येते. अनेक दिवसांपूर्वी झालेला जंतुसंसर्ग वाढल्याने त्वचा, नसा यावर परिणाम होणे, म्हणजेच कुष्ठरोग होय. हा आजार हळूहळू वाढणारा असल्यामुळे संसर्ग झाल्यानंतरही बरीच वर्षे त्रास जाणवत नाही. संसर्ग झाल्यानंतर त्वचा पूर्णतः खराब होऊन तिच्यावर गाठी तयार झाल्याचे जाणवते. मुख्यतः तरुण व्यक्तींमध्ये आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर प्रतिकारशक्ती कमी असणारी व्यक्ती आजाराला बळी पडते. तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जात असे. यामुळे कुष्ठरोग्यास वाळीत टाकले जाई. बाबा आमटे यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. इ. स. 1952 साली वरोराजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. इ.स. 2008 सालापर्यंत 176 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन आज 3 हजार 500 कुष्ठरोग्यांचे हक्काचे घर बनले आहे.

कुष्ठरोग म्हणजे काय व त्याची लक्षणे
कुष्ठरोग हा जंतुमुळे होणारा अल्पशा सांसर्गिक आजार आहे. हा जंतु आपल्या शरीरात त्वचा व मज्जादाह यांना आघात करून स्वान पेशीत वास्तव करतो. त्वचा तेलकट, गुळगुळीत, लालसर असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, अंगावर गाठी येणे, मज्जा जाड व दुखऱ्या होणे, विकृती येणे, न खाजणारा, न दुखणारा फिकट लालसर चट्टाही कुष्ठरोगाची लक्षण आहेत.

कुष्ठरोगावर औषधोपचार
1940 च्या सुमारास डॅपसोन हे औषध कुष्ठरोगावर उपयुक्त असल्याचा शोध लागल्यावर हा आजार लवकरच नियंत्रित होईल अशी आशा उत्पन्न झाली होती. अनेक रुग्ण बरेही झाले, परंतु लेप्रोमॅटस रुग्णांना हे औषध आयुष्यभर चालू ठेवावे लागे. काही रुग्णांनी अनियमित औषध घेतल्याने व काही रुग्णांना कमी मात्रेत औषध दिले गेल्यामुळे जंतू या औषधांना दाद देईनासे झाले. त्यामुळे 1960 सालानंतर डॅपसोनला दाद न देणाऱ्या जंतूंची व या जंतूंनी पछाडलेल्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली. या कारणाने जागतिक आरोग्य संघटनेने 1982 साली बहुविध उपचार पद्धतीचा वापर जगभर सुरू केला. तेव्हापासून कुष्ठरोगावर बहुविध औषधोपचार नावाचे प्रभावी उपचार उपलब्ध आहे. सध्या पाचपेक्षा कमी चट्टे असणाऱ्या रुग्णांना महिन्यातून एक वेळा या पद्धतीने सहा महिने उपचार दिले जातात. तर पाचपेक्षा जास्त चट्टे असलेल्या रुग्णांना तीन औषधे असलेली उपचार पद्धत वापरली जाते व कमीत कमी एक वर्ष उपाययोजना केली जाते. कुष्ठरोग कोणत्याही अवस्थेत पुर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगाची औषधे सर्व सरकारी दवाखान्यात मोफत मिळतात. कुष्ठरुग्ण घरात राहूनच उपचार घेऊ शकतो. कुष्ठरोगावरील औषधोपचाराने कुठल्याही प्रकारचे गंभीर परिणाम होत नाही.

कुष्ठरुग्णास दिल्या जाणाऱ्या संदर्भ सेवा
कुष्ठरुग्णास जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी विशेष संदर्भ सेवा दिल्या जातात. कुष्ठरोगाचे निदान भौतिकोपचार केला जातो. विकृती रुग्णांना विशेष प्रकारचा व्यायाम शिकवला जातो. पायांना बधीरता असल्यास एम.सी.आर. चप्पल दिली जाते. व त्यांचे समुपदेशन केले जाते.

कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 5 सप्टेंबर 2017 पासून मोहिम राबविण्यात येत आहे. समाजात दडून राहिलेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, सांसर्गिक कुष्ठरुग्ण उपचाराखाली आणून सांसर्गिक साखळी खंडीत करणे ही या मोहीमेची उद्दिष्ट आहे. यासाठी समाजातील लपून राहिलेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध उपचारासाठी आणण्याकरिता 5 ते 20 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान ग्रामीण व निवडक शहरी (झोपडपट्टी) भागात राबविण्यात येणार आहे. या अभियानात एक पुरुष व एक स्त्री स्वयंसेवक (प्रामुख्याने आशा वर्कर) यांच्या पथकामार्फत 14 दिवस घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणात सर्व व्यक्तींची शारीरिक तपासणी करण्यात येणार असून ग्रामीण भागात दररोज 20 व शहरी भागात 25 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

या अभियानाच्या काळात आढळून आलेल्या सर्व संशयीत कुष्ठरुग्णांची नोंद पथकाद्वारे घेण्यात येणार आहे. त्यांचे निश्चित निदान शासकीय, निमशासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे. कुष्ठरोगाचे निश्चित निदान झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणातंर्गत गृहभेटीसाठी जिल्ह्यात 2 हजार 816 पथके तयार करण्यात आली असून यामध्ये 592 पर्यवेक्षकांचाही समावेश आहे. या पथकातील स्वंयसेवक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून पर्यवेक्षण जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी घरोघरी येणाऱ्या पथकास सहकार्य करावे. घरातील सर्व व्यक्तींची स्त्री व पुरुष आरोग्य स्वंयसेवकांकडून तपासणी करुन घ्यावी. अभियानात आढळून आलेल्या संशयीत रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन घ्यावी. तसेच 1) अंगावरील कुठलाही फिक्कट, लालसर डाग/चट्टे, 2) तेलकट, लालसर, जाडसर, त्वचा व जाड कानाच्या पाळया, 3) हातापायातील सून्नपणा/ बधिरता व शारीरिक विकृती या तीन गोष्टी तपासून घ्याव्यात जेणेकरुन कुष्ठरोगापासून निश्चितपणे मुक्ती मिळेल.

लवकर निदान व लवकर उपचार हाच कुष्ठरोग निमुर्लनाचा आधार आहे. कुष्ठरोग अनुवंशिक नाही, पाप पुण्याशी संबंधित नाही. औषधोपचार सर्व शासकीय, निमशासकीय दवाखान्यात, केंद्रात मोफत दिला जातो. कुष्ठरोग इतर आजारासारखाच रोगजंतूमुळे होणारा आजार आहे. त्वरीत निदान व पूर्ण उपचाराने कुष्ठरोग बरा होऊन विकृती टाळता येत असल्याने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे.

संकलन :
जिल्हा माहिती कार्यालय,
जळगाव
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा