महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला शाश्वत विजेचा पुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध- ऊर्जामंत्री बावनकुळे शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
पॉवर फॉर ऑल साठी जिल्ह्याला 124 कोटी रुपयांचा निधी

जालना, दि. 12 – राज्यातील जनतेला व सर्व शेतकऱ्यांना योग्य दाबाने व सुरळीतरित्या विजेचा पुरवठा व्हावा यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉवर फॉर ऑल (सर्वांसाठी वीज) यासाठी 5 हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजुर केले असुन जालना जिल्ह्यासाठी यामधुन 124 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. येत्या 2019 पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला शाश्वत विजेचा पुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेख बावनकुळे यांनी केले.

येथील मातोश्री लॉन्स येथे जालना मंडळांतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत प्रस्तावित 33 के.व्ही. केंद्राचे संगणकीय प्रणालीद्वारे भूमिपुजन मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री बावनकुळे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व मस्त्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे-पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, विलास खरात, कैलास गोरंट्याल, भास्कर दानवे, श्री भांदरगे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, ऊर्जा विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया,मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता कैलास हुमणे आदींची उपस्थिती होती.

ऊर्जा मंत्री श्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील जनतेला सर्व शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असुन जालना जिल्ह्यात शहरी भागाचे उर्जीकरण करण्यासाठी 33 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असुन भोकरदन शहरासाठी 4 कोटी, परतुर शहरासाठी 6 कोटी, अंबड शहरासाठी 6 कोटी तर जालना शहरासाठी 20 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातुन करण्यात येणारी कामे ही येत्या 2019 पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. जिल्ह्यातील 14 हजार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीजेची जोडणी देण्यात आली असुन उर्वरित शेतकऱ्यांनाही तातडीने वीजेची जोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विकास कामामध्ये जे अधिकारी, कर्मचारी दिरंगाई करतील अशांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

जिल्ह्यात वीजेचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येत असुन जिल्ह्याचा ऊर्जेचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये वीजेची अपूर्ण असलेली कामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुनही पालकमंत्र्यांनी या कामासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करत वीजेची होत असलेली कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याची गरज आहे. जे कंत्राटदार दर्जेदार कामे करणार नाहीत त्यांच्या कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही श्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत वीज मिळावी तसेच शेतकऱ्यांना वीजेसाठी विद्युत विभागावर अवलंबुन राहू नये यासाठी राज्यात सौरकृषी वाहीनी योजना लवकरच येऊ घातली आहे. या योजनेच्या माध्यमातुन येणाऱ्या काळात सोलरद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला वीज देण्याचा शासनाने निर्णय घेतला असुन जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर भर देण्यात येत असुन या सर्व शाळांना सोलरच्या माध्यमातुन वीजेचा पुरवठा करण्यात यावा. यासाठी आवश्यक असणारा पन्नास टक्के निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात यावा तर उर्वरित पन्नास टक्के निधी ऊर्जा विभागाकडून देण्यात येईल. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात वीज देयकांची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे सांगुन या थकबाकीपैकी दंडव्याज बाजुला करुन उर्वरित मुळ रक्कम ऊर्जा विभागाकडे भरणा करण्यात यावी. थकबाकीतुन प्राप्त होणारा निधी जिल्ह्यात विद्युत विकासावरच खर्च करण्यात येणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी यामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्यातील अवैध दारुला आळा घालण्यासाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या माध्यमातुन आपल्या गावामध्ये अवैधदारु निर्मिती अथवा विक्री होत असल्यास त्यास या दलाच्या माध्यमातुन प्रतिबंध करण्यात येणार आहे. यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व गावामध्ये येत्या एक महिन्याच्या कालावधीत ग्रामरक्षक दलाचे गठण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीज पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असुन ऊर्जामंत्री श्रीबावनकुळे यांच्या प्रयत्नातुन जिल्ह्यातील जवळपास 15 हजार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीजेचे कनेक्शन देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यासाठी 49 33 के.व्ही.ची केंद्रे मंजुर करण्यात आले असुन त्यापैकी 21केंद्रांना जागा मिळाली आहे. 132 के.व्ही ची 4 केंद्रे तर 220 के.व्ही ची 4 केंद्रे मंजुर करण्यात आली आहेत.त्यापैकी परतुर येथील 220 के.व्ही चे केंद्र कार्यान्वित करण्यात आले असुन पुर्ण क्षमतेने ते काम करत आहे तर नागेवाडी येथील केंद्राचे आज भुमिपुजन करण्यात येत आहे. जालना जिल्ह्याच्या विद्युत विकासासाठीजवळपास 185 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन येणाऱ्या काळात प्रत्येक नागरिकाला योग्यदाबाने वीजेचा पुरवठा करण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात अनेक दिवसापासुन पावसाने दडी मारली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असुन उपलब्ध पाणी शेतीपीकाला देण्यासाठी वीजेचे आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असुन जिल्ह्याचा वीजेच्या बाबतीतला बॅकलॉग तातडीने पूर्ण व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्याकडे वीजेची कमतरता नाही. परंतु वीजेचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी इन्फा्रस्ट्रक्चरची आवश्यक असते. हीच कमतरता आपल्या जिल्ह्यात आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा करण्यासाठी इन्फा्रस्ट्रक्चरच्या उभारणीवर भर देण्यात येत येणाऱ्या काळात इन्फा्रस्ट्रक्चरची पुर्णपणे उभारणी झाल्यास जिल्ह्यातील जनतेला सुरळीत व योग्य दाबाने वीजेचा पुरवठा करता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी आमदार राजेश टोपे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिला यांच्यासह ऊर्जा विभागातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा