महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य : रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल गुरुवार, ०९ ऑगस्ट, २०१८
धुळे : नरडाणा, ता.शिंदखेडा येथील औद्योगिक वसाहतीत उद्योग- व्यवसायासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. तसेच पाणी, महामार्ग, रेल्वे, वीज, कुशल मनुष्यबळ आदी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्योजकांनी शिंदखेडा तालुक्यात उद्योग उभारणीसाठी पुढे यावे. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

नरडाणा येथे महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत पाचशे कोटी रुपये खर्चाच्या वंडर सिमेंट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादनाचा शुभारंभ मंत्री श्री.रावल यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री.रावल यांनी सांगितले, वंडर सिमेंटच्या संचालकांना नरडाणा औद्योगिक वसाहतीत गुंतवणुकीची एका भेटीत विनंती केली होती. तसेच आवश्यक सहकार्याचे आश्वासनही दिले होते. त्यानुसार वर्षभरापूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. आता प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. यामुळे तालुक्यातील हजारावर तरुणांना रोजगाराच्या संधीची उपलब्धता झाली आहे.

नरडाणा औद्योगिक वसाहतीत आतापर्यंत पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे किमान तीन हजार तरुणांना रोजगारांची उपलब्धता झाली आहे. अन्य भागातील उद्योजकांनीही या औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करावेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.

तापी नदीवरील सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजनेचे लवकरच भूमीपूजन होईल. तसेच शिंदखेडा तालुक्यातून वाहणाऱ्या बुराई नदीवर बांधण्यात आलेल्या विविध बंधाऱ्यांमुळे बुराई नदी बारमाही होईल. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील क्षेत्र सिंचनाखाली येईल, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

यावेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषद कामराज निकम, वंडर सिमेंट कंपनीचे संचालक परमानंद पाटीदार, कार्यकारी संचालक जे. सी. तोष्णीवाल, सहअध्यक्ष सी. एस. शर्मा, प्रकल्पप्रमुख डी. के. जैन, अभियांत्रिकीप्रमुख सी. पी. बिष्णोई, मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुख सुनील भटनागर, अमित नारायण, नारायण दीक्षित, संजीवनी सिसोदे आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा