महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्र्यांच्या हस्ते जलशुध्दीकरण संयंत्राचे उद्घाटन गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
नाममात्र दरात शुध्द पाणी - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर :
ऑरेंज सुवान एनर्जी प्रा. लि. या कंपनीने आपल्या सामाजिक बांधिलकी निधीतून १२ लाख रुपये किमतीचे जलशुध्दीकरण यंत्राचे खरबीवासीयांसाठी उभे करुन दिले आहे. कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून आजपासून जनतेला शुध्द पिण्याचे पाणी नाममात्र दरात मिळणार आहे. त्या पाण्याचे महत्त्व जाणा, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. खरबी येथील जिल्हा परिषद शाळेत जलशुध्दीकरण यंत्रांचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘शुध्द सुरक्षित पाणी, जीवन निरोगी व समाधानी’ या ब्रीद वाक्यानुसार जिल्ह्यातील जनतेला सामाजिक दायित्वाच्या निधीतून (सीएसआर) जनतेला शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज खरबी येथील जिल्हा परिषद शाळेत ८७ आणि ८८ वे जलशुध्दीकरण यंत्राचे खरबीवासीयांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. पाच रुपये प्रति २० लीटर या अगदी नाममात्र दराने शुध्द पाणी मिळणार आहे.

हे पाणी केवळ स्वयंपाक आणि पिण्यासाठी वापरण्यासाठी आहे. त्यामुळे वैभवलक्ष्मी महिला बचत गटाने कमीत कमी ६०० घरांना सदस्य करुन घ्यावे. त्यामुळे या जलशुध्दीकरण यंत्राचे वीज बील आणि देखभाल-दुरुस्तीचा खर्च यातून निघाला पाहिजे. त्यासाठी प्रतिदिन ५०० रुपये वेगळे काढून ठेवण्याचे बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती जया अनुष्ठाने यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

यापूर्वी त्यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा, कामठी आणि ग्रामीण नागपूर या भागात ८६ जलशुध्दीकरण यंत्रांचे उद्घाटन करुन जनतेला शुध्द पाणी पाच रुपये प्रति २० लीटर दराने उपलब्ध करुन दिले असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा