महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
माध्यमांनी फेक न्यूज बाबत प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा - अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरुवार, ०२ ऑगस्ट, २०१८
लातूर :- आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणावर मोबाईलच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सामाजिक माध्यमांचा वापर करत आहेत. परंतु ह्या माध्यमांचा वापर करत असताना त्यावर आलेल्या संदेशाची कोणत्याही प्रकारची खात्री केली जात नाही. त्यामुळे बहुतांश वेळा अनुचित प्रकार घडतात. तरी अशा सर्वसामान्य लोकांना फेकन्यूजबाबत प्रबोधन करण्यासाठी प्रसार माध्यमांनी ही पुढाकार घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, लातूर व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यमातील प्रतिनिधीसाठी आयोजित फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. डोळे बोलत होते.


यावेळी पोलीस उप अधीक्षक (गृह) मधुकर जवळकर, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, शाहू महाविद्यालयाच्या मास ॲन्ड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. शिवशंकर पटवारी, सायबर तज्ज्ञ प्रा. डी. आर. सोमवंशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे आदीसह प्रसार माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक डोळे पुढे म्हणाले की, मागील काही दिवसांमध्ये राज्यात समाज माध्यमांतील संदेशाची खातरजमा न केल्याने अनुचित घटना घडलेल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य शासनाने या कार्यशाळेचे आयोजन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केलेले आहे. या माध्यमातून प्रसार माध्यमांनी सामाजातील लोकांचे फेकन्यूजबाबत प्रबोधन करावे.

समाजमाध्यमांवरील संदेशाची योग्य प्रकारे खात्री न केल्यास कोणतीही मोठी अनुचित घटना घडू शकते. त्याकरिता प्रत्येक संदेशांची प्रत्येकांनी खात्री करुनच तो पुढे फॉरवर्ड करावा. तसेच नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा हाती घेऊ नये. लातूर जिल्हयातील नागरिकांनी त्यांच्याकडे आलेल्या माहितीबाबत जवळील पोलीस स्टेशन, पोलीस नियंत्रण कक्ष (02382-242296/242442) तसेच व्हॉटस्अप क्रमांक 9527649100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे श्री. डोळे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पोलीस उप अधीक्षक श्री. जवळकर म्हणाले, समाज माध्यमांवरील संदेशाची योग्य खात्री न केल्यामुळे अनुचित घटना घडतात. सायबर सेलच्या माध्यमातून आलेल्या संदेशाची पडताळणी करुन त्याचा आढावा घेऊन फेक न्यूज देणाऱ्या समाजकंटकावर स्वयं पुढाकार घेऊन कारवाई करण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने कसे घेता येईल, याबाबत प्रसारमाध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

यावेळी प्रा. बी. आर. सोमवंशी, प्रा. पटवारी पत्रकार अरुण समुद्रे आणि दीपरत्न निलंगेकर यांनी फेक न्यूज संदर्भात मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी फेक न्यूज परिणाम आणि दक्षता ही कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा