महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रोहा येथे 18 जुलै रोजी 'विज्ञान एक्सप्रेस' शनिवार, १५ जुलै, २०१७
अलिबाग : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प असलेल्या ' विज्ञान एक्सप्रेस अर्थात सायन्स एक्सप्रेस मंगळवार दि.18 जुलै 2017 रोजी रोहा रेल्वे स्थानक येथे एक दिवसासाठी दाखल होत आहे. या वातानुकुलित गाडीत जिल्हावासियांना 'जलवायु परिवर्तन' या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन पाहण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे. भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय, वन मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि जैव तंत्रज्ञान मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.

रोहा रेल्वे स्थानक येथे दि.18 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. दरम्यान हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी उपलब्ध असेल. यावेळी महाविद्यालयीन - शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी, नागरिक समाजातील सर्व घटकांसाठी हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल, असे सायन्स एक्सप्रेसचे व्यवस्थापक नितीन तिवणे यांनी कळविले आहे.

काय आहे सायन्स एक्सप्रेस?
सायन्स एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा (DST) विशेष प्रकल्प आहे. ही 16 डब्यांची वातानुकुलित प्रदर्शन ट्रेन ऑक्टोबर 2007 पासून भारत भ्रमण करीत आहे. आतापर्यंत 01 लाख 56 हजार किमीचा प्रवास पूर्ण करणाऱ्या या गाडीने आठ वेळा देशाचा प्रवास पूर्ण केला आहे. देशभरातील 510 स्थानकांवर या गाडीने आपली उपस्थिती नोंदवली आहे. आतापर्यंतच्या 1750 प्रदर्शन दिवसांमध्ये या प्रदर्शनास अति प्रचंड असा 1.70 कोटी प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभल्याने 'सायन्स एक्सप्रेस' हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक दर्शक लाभलेले प्रदर्शन बनले असून त्यासाठी तब्बल 12 वेळा लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विज्ञानाच्या राणीची दखल घेतली गेली.

सायन्स एक्सप्रेसने आपल्या पहिल्या चार पर्वामध्ये जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दखल घेतली. भारतातील समृद्ध जैवविविधतेचा मागोवा घेणारे प्रदर्शन त्या पुढील तीन पर्वामध्ये सायन्स एक्सप्रेस जैवविविधता विशेष या नावाने प्रदर्शित झाले. सायन्स एक्सप्रेस आठवे पर्व हे जागतिक तापमान वाढ आणि संबंधित आव्हानांना दर्शवणारे होते जे सायन्स एक्सप्रेस जलवायु परिवर्तन विशेष या नावाने प्रदर्शित केले गेले.

जलवायु परिवर्तन विशेष संकल्पना : नववे पर्व
सध्याचे नववे पर्व हे 'जलवायु परिवर्तन विशेष' याच संकल्पनेसाठीचे दुसरे वर्ष असून याचा शुभारंभ दि. 17 फेब्रुवारी 2017 रोजी दिल्ली येथील सफदरजंग रेल्वेस्टेशनवर एका शानदार कार्यक्रमाद्वारे झाला. या सोहळ्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, तसेच तत्कालीन केंद्रीय वने पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्री कै. अनिल माधव दवे यांची उपस्थिती लाभली.

19 हजार किमी प्रवास आणि 68 स्थानकांवर मुक्काम
सध्याच्या पर्वाकरिता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), वन, पर्यावरण आणि जलवायु परिवर्तन विभाग (MoEFCC), जैवतंत्रज्ञान विभाग, रेल्वे मंत्रालय, भारतीय वन्य जीव संस्था(WII) आणि विक्रम ए साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर या साऱ्यांनी मिळून अथक प्रयत्न केले आहेत. 19000 किमी चा प्रवास 17 फेब्रुवरी ते 08 सप्टेंबर या कालावधीत सायन्स एक्सप्रेस करणार असून 68 स्थानकांवर गाडीचा मुक्काम असेल.

मुख्यतः विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बनवले गेलेले हे प्रदर्शन जनसामान्यांसाठीही खुले आहे. प्रदर्शनाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी www.sciencexpress.in या संकेतस्थळावर भेट देता येईल.

प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच चौकशीसाठी sciencexpress@gmail.com वर ई-मेल पाठवता येईल. संपर्कासाठी 09428405407 या मोबाइल क्रमांकावर संपर्क करता येईल.

Joy of Science lab (JOS) या प्रयोगशाळेत आगाऊ नोंदणी केल्यास जास्तीत जास्त 20 विद्यार्थ्यांच्या तुकडीला प्रवेश दिला जातो.

या संधीचा लाभ घेऊन जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी, महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सायन्स एक्सप्रेसचे व्यवस्थापक नितीन तिवणे यांनी केले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा