महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तुर खरेदी प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा - बबनराव लोणीकर सोमवार, १५ मे, २०१७
  • गुन्हे अन्वेषण विभागास संबंधित विभागाने सहकार्य करावे

जालना : जालना जिल्ह्यातील शासकीय तुर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर परराज्यातील व्यापाऱ्यांनी तुरीची विक्री केल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन याचा छडा लावावा व या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

मंत्री महोदयांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील विविध विकास विषयक कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री.लोणीकर बोलत होते.

यावेळी जालन्याचे उप विभागीय अधिकारी केशव नेटके, परतूरचे ब्रिजेश पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, मार्केटींग अधिकारी श्री.पाटील, सचिव श्री.चौगुले, जालन्याचे तहसिलदार विपीन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र जगताप यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले की, पात्र शेतकरी सोडून तुरीचा पेरा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर शासकीय तूर खरेदी केंद्रावर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील तुर खरेदी झाल्याच्या तक्रारी आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुरीच्या पेऱ्यापेक्षा अधिक प्रमाणात तूर विक्री करण्यात आली आहे, तुरीचा पेरा नसतानाही त्या शेतकऱ्याच्या नावावर तुरीची विक्री केली आहे तसेच नजिकचे तूर खरेदी केंद्र सोडून जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या तूर खरेदी केंद्रावर तुरीची विक्री केली आहे याबाबींची गंभीरपणे दखल घेऊन या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करण्यात यावा. मार्केट कमिटीच्या आवारात 3 हजार 500 तुरीची बेवारस पोती आढळून आली आहेत. या बेवारस पोत्यांच्या पंचनामाही करण्यात आला असुन ही तुरीचे पोते कोणाचे आहेत याचाही तपास लावण्याचे निर्देश देत गुन्हे अन्वेषण विभागाला या कामी मार्केट समितीसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती मदत करावी. या कामात हयगय अथवा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याच्या सुचना पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी दिल्या.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत आष्टीसह 16 गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या कामासाठी उपलब्ध असलेल्या निधीचे नियोजन करुन कामांचे प्रस्ताव तातडीने दाखल करण्यात यावेत व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी. या कामी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा