महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची काटेकोर अंमलबजावणी करा - पालकमंत्री संजय राठोड गुरुवार, १० जानेवारी, २०१९
प्रकल्पाची तोंडओळख व रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळा
वाशिम :
निसर्गाच्या लहरीपणामुळे व वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत असून शेती तोट्यात चालली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश असून या गावांमध्ये प्रकल्पाची काटेकोर अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

नियोजन भवन येथे आज आयोजित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प तोंडओळख व रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी, तहसीलदार बळवंत अरखराव, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर, संतोष वाळके, करडा कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश डवरे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. राज्यातील १५ जिल्ह्यात हा प्रकल्प राबविला जाणार असून याकरिता ५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील सहा वर्षे या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु राहणार आहे. प्रकल्प राबविण्याची जबाबदारी संबंधित गावाच्या ग्रामस्तरीय समितीवर सोपविण्यात आली आहे. संबंधित गावाचे सरपंच हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपल्या गावातील शेतीच्या गरजेनुसार आवश्यक कामांचे गावस्तरावर सूक्ष्म नियोजन करून शेतीचा व गावाचा विकास साधण्यासाठी सरपंच मंडळींनी पुढाकार घ्यावा.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून कोणकोणत्या प्रकारची कामे करता येतील, त्यासाठी कोणती कार्यवाही करणे आवश्यक आहे, याची माहिती कृषी विभागाने संबंधित ग्रामस्तरीय समितीला द्यावी. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून कोणती कामे करता येतील, याची माहिती ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांना द्यावी. जेणेकरून गावस्तरावर कामांचे सूक्ष्म नियोजन करणे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

श्रीमती देशमुख म्हणाल्या, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर मात करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची आपल्या गावांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचानी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात श्री.गावसाने यांनी सांगितले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील १४९ गावांची निवड झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ८१ गावांमध्ये यावर्षी प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून या प्रकल्पाची तोंडओळख करून देणे व प्रकल्पाची रूपरेषा सांगण्यासाठी गावस्तरीय समितीचे अध्यक्ष अर्थात सरपंच व ग्रामसेवक यांनी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. जे. अरगडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपविभागीय कृषी अधिकारी श्री.चौधरी यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा