महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागरिकांनी मागितलेली माहिती देण्याकडे अधिकाऱ्यांचा कल असावा - राज्य माहिती आयुक्त दिलीप धारुरकर शुक्रवार, १० मे, २०१९


दोन दिवसीय सुनावणीत जिल्ह्यातील ३०१ प्रकरणांचा निपटारा

बीड :
जिल्ह्याच्या स्तरावर जावून माहिती अधिकार अधिनियमांची द्वितीय अपीलाची सुणावणी घेण्याचा मराठवाड्यातील ह दुसरा प्रयोग असून माहिती अधिकारातंर्गत आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या बीड जिल्ह्यातील ३०१ प्रकरणांची सुनावणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती, या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याची माहिती राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबादचे राज्य आयुक्त दिलीप धारूरकर यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व शासकिय विभागातील जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांचे प्रशिक्षण आयुक्त श्री. धारुरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षणानंतर माहिती देताना राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर म्हणाले, सामान्य माणसाला माहितीचा अधिकार मिळावा, यासाठी माहिती आयोगाची स्थापना झालेली आहे. बीड जिल्ह्यातून आयोगाकडे ३०१ प्रकरणे दाखल झालेली होती. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी हिंगोलीनंतर बीड जिल्ह्यात जागेवर प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयोग राबविण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत आयोगाकडे दाखल असलेली सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

यामध्ये ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका आणि विविध शासकीय कार्यालयातील प्रकरणांचा समावेश होता. आता जिल्ह्यात एकही प्रकरण प्रलंबित नसल्याची माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी दिली. सुनावणीच्या वेळी ज्या कार्यालयाचे अधिकारी गैरहजर होते. त्यांना दंडात्मक कारवाई का करू नये अशा प्रकारच्या नोटीस पाठविण्यात येत आहेत.

शासकीय अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. त्यांना हवी असलेली माहिती वेळेत देणे सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे अधिकार देखील आयोगाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा