महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध - संभाजीराव पाटील-निलंगेकर गुरुवार, १० जानेवारी, २०१९
सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा'
बांधकाम कामगारांना शासनातर्फे पनवेल येथे विविध लाभांचे वाटप



अलिबाग :
इमारत बांधकाम कामगारांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, आरोग्य, निवास या सुविधा पुरविण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाने २८ योजना तयार केल्या आहेत, असे प्रतिपादन कामगार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आज खांदेश्वर पनवेल येथे केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदित बांधकाम कामगारांना लाभ वाटप सोहळा आज फोर कोर्ट एरिया, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर, नविन पनवेल येथे श्री.पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्यास पालकमंत्री रविंद्र चव्हाण, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, पनवेलच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, कामगार उद्योग, उर्जा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, कामगार आयुक्त राजीव र.जाधव, मंडळाचे सदस्य श्रीपाद कुसुरकर, अपर कामगार आयुक्त वि.के.बुवा, उपआयुक्त भ. मा.आंधळे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.पाटील-निलंगेकर म्हणाले की, राज्यात २७ लाख बांधकाम कामगार असणे अपेक्षित होते, मात्र मंडळाकडे प्रत्यक्ष नोंदणी केवळ १ लाख ४० हजार इतकीच होती. विद्यमान शासन सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल विश्वकर्मा योजना जाहीर केली. त्यानंतर या क्षेत्रात भरीव काम करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत मंडळाने १२ लाख कामगारांची नोंद केली आहे. तब्बल ४ लाख कामगारांना प्रत्यक्ष बँक खात्यात लाभ ही देण्यात आला आहे.

पिढ्यानपिढ्या मोल मजुरी करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे, त्यांचे स्वतःचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी योजना तयार केल्या आहेत. इतरांची घरे बांधणाऱ्या या कामगारांना स्वतःचे हक्काचे घर असावे, यासाठी अडीच लाख रुपये देण्याची घोषणा ही श्री.निलंगेकर यांनी यावेळी केली.

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे सरकार - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय हे शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे हे आहे. त्यानुसार सर्व शासन काम करीत असून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे हे शासन आहे. कामगारांच्या अडी अडचणीला, त्याच्या मुलांच्या शिक्षणाला, आजारपणाला हे मायबाप शासन विविध २८ योजनांच्या माध्यमातून मदत करेल. कामगारांच्या पाठीशी उभे राहणारे हे शासन आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

याप्रसंगी नोंदित बांधकाम कामगारांना मान्यवरांच्या हस्ते विविध लाभ तसेच अत्यावश्यक किट व सुरक्षा किट वाटप करण्यात आले.

इमारत व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव चु. श्रीरंगम यांनी प्रास्ताविक केले. त्यातून त्यांनी मंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. श्रीरंगम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा