महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हा वार्षिक योजनेसाठी कालबद्ध नियोजन करावे- जयकुमार रावल शुक्रवार, १४ जुलै, २०१७
नंदुरबार : जिल्हा वार्षिक योजना 2017-2018 चा नियतव्यय वेळेत खर्च होण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसह विविध प्रक्रिया वेळेत पार पडण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक बिरसा मुंडा नियोजन सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, खासदार डॉ. हीना गावित, सर्वश्री आमदार सुरुपसिंह नाईक, डॉ. विजयकुमार गावित, चंद्रकांत रघुवंशी, उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. मोहन आदी उपस्थित होते.

श्री. रावल म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेत 2017- 2018 करीता 67.34 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मंजूर होणारा नियतव्यय वेळेत खर्च होईल, अशी दक्षता प्रत्येक विभागप्रमुखाने घेतली पाहिजे. 2017- 2018 या आर्थिक वर्षातील नियोजित नियतव्ययाच्या खर्चासाठी कालबद्ध नियोजनाची प्रक्रिया पार पाडावी. त्यासाठी तत्काळ सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. 20 सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मान्यतेसह विविध प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबरच्या प्रारंभी कामांना सुरूवात होईल. जानेवारी 2018 अखेरपर्यंत कामे पूर्ण करीत फेब्रुवारी 2018 अखेरपर्यंत सर्व उपक्रमांचे लोकार्पण होईल, असे नियोजन केले पाहिजे.

जिल्हा वार्षिक योजना 2016- 2017 अंतर्गत आदिवासी उपयोजना व आदिवासी योजना क्षेत्राबाहेरील कामासाठी (ओटीएसपी) एकूण रुपये 642.07 लक्ष निधी मंजूर झालेला होता. त्यापैकी रुपये 163.54 लक्ष निधी खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 95.60 टक्के आहे. जिल्हा वार्षिक योजना 2016- 2017 अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनासाठी एकूण रुपये 950.88 लक्ष निधी मंजूर झालेला होता. त्यापैकी रुपये 950.88 लक्ष निधी खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 100.00 टक्के आहे. जिल्हा वार्षिक योजना 2016- 2017 अंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी एकूण रुपये 7640.00 लक्ष निधी मंजूर झालेला होता. त्यापैकी रुपये 7625.55 लक्ष निधी खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 99.81 टक्के आहे, असेही यावेळी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विभागप्रमुखांनी नियोजन करावे, असेही श्री. रावल यांनी सांगितले. यावेळी जलयुक्त शिवार अभियान, शिक्षण, आरोग्य, वीज आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत उपस्थित लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला.

डॉ. कलशेट्टी यांनी प्रास्ताविक सांगितले की, जिल्हा वार्षिक योजनेचा नियतव्यय खर्चासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करुन प्रशासकीय मान्यतेसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावेत.

जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा