महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे २४ कोटी ८० लाख मिळावेत - ए.टी.नाना पाटील मंगळवार, १० जुलै, २०१८
नवी दिल्ली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरविणाऱ्या जळगाव जिल्हयातील १६ हजार ७५७ शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची २४ कोटी ८० लाखांची रक्कम लवकर प्रदान करण्यात यावी अशी मागणी जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील यांनी आज केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांना निवेदनाद्वारे केली आहे.

श्री.पाटील यांनी कृषी भवन येथे आज राधामोहन सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपविले. या निवेदनात म्हटले आहे, वर्ष २०१७ मध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार २५४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला व प्रिमीयमची रक्कमही भरली. वर्ष २०१७ च्या खरीप हंगामात निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतीचे नुकसान झाले, परिणामी जिल्ह्यातील ३४ हजार १६७ शेतकऱ्यांनी ४४ कोटी ७१ लाखांच्या मोबदल्यासाठी अर्ज दाखल केले. मात्र, विमा कंपनींकडून गेल्या वर्षभरापासून यातील १६ हजार ७५७ शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची २४ कोटी ८० लाखांची रक्कम मिळालेली नाही. दरम्यान, श्री. पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्री. गोयल यांना आज या मागणी संदर्भात निवेदन सोपविले आहे.

खरीपाचा हंगाम सुरु झाला असून मशागत व पेरणीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक गरज पाहता त्यांना विम्याची रक्कम तत्काळ मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्याचे पैसे मिळावेत त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री व केंद्रीय अर्थमंत्री यांनी संबंधितांना आदेश करावे व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी श्री.पाटील यांनी केली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा