महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी तात्काळ कार्यवाही पूर्ण करा - दिवाकर रावते रविवार, ०८ ऑक्टोंबर, २०१७
कर्जमाफी योजनेचा आढावा
चावडी वाचन तात्काळ पूर्ण करा
दिवाळीपूर्वी लाभ देण्यासाठी पूर्तता करा

नागपूर :
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिवाळीपूर्वी देण्याच्या दृष्टीने चावडी वाचनासह बँकानी कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण याद्यांची तपासणी करुन तात्काळ अपलोड करण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी योजनेचा आढावा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा सहकारी निबंधक एस.एल.भोसले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे श्री.कदम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, लिड बँकेचे व्यवस्थापक अय्युब खान आदी उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांसह आवश्यक कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे समाधान व्यक्त करतांना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की कर्जमाफी योजनेअंतर्गत दिड लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी तसेच थकीत कर्जाचे रुपांतरण व गठण नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन आदी नुसार शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामंपचायतमध्ये चावडी वाचन करुन अंतिम करावे. जिल्ह्यात 771 ग्रामपंचायतीपैकी 498 ग्रामपंचायतीमध्ये चावडी वाचन पूर्ण झाले असून ग्रामपंचायती निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अपूर्ण असलेले चावडी वाचन आचारसंहिता संपल्याबरोबर पूर्ण करावे अशा सूचनाही यावेळी श्री.रावते यांनी दिल्या.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी सभासदांच्या यादीच्या पडताळणीचे काम पूर्ण केले असून शासनास ऑनलाईन माहिती सादर करण्याचे कामही पूर्ण केले आहेत. राज्यात नागपूर जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेसंदर्भात सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करतांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने उर्वरित कामही येत्या दोन दिवसात पूर्ण करावे असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात जिल्ह्यात 1 लक्ष 9 हजार 400 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले असून यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 32 हजार 143 शेतकरी सभासदांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कर्जमाफी योजनेच्या तरतुदीनुसार सहकार विभागाने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाही संदर्भात जिल्हा सहकारी निबंधक श्री.भोसले यांनी यावेळी माहिती दिली. खरीप पिक कर्ज वाटपासंदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा